‘सूर-ताल विलेपार्ले’ची एस डी आणि आर डी बर्मन अर्थात पंचमदांना संगीतमय आदरांजली!

मुंबई:मुंबईतील ‘सूर-ताल’-विलेपार्ले(पूर्व) ही संस्था गेली अनेक वर्ष संगीत साधनेसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि नवोदित कलावंत यांच्यासाठी ‘सुर ताल’चे व्यासपीठ कायम उपलब्ध आहे. गतवर्षी गानसम्राज्ञी ‘भारतरत्न लता मंगेशकर’ आणि ‘संगीतकार बप्पी लाहिरी’ यांना संगीतमय आदरांजली वाहणारी ‘सांज ये गोकुळी’ ही बहारदार सुरेल मैफिल ‘सूर-ताल’ने आयोजित करून गिरगांवकरांची पसंती मिळविली होती. २२ जूनला झालेल्या कार्यक्रमात खास एस डी आणि आरडींच्या गाण्यांची मैफिल परत एकदा आयोजित करण्याची विनंती ‘सूर-ताल’च्या आयोजकांना गिरगावकरांकडून करण्यात आली होती. त्यानुसार म्युझिकल वर्ल्ड ऑफ बर्मन हा एस डी आणि आरडी बर्मन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या अजरामर बहारदार लोकप्रिय गाण्यांचा गिरगावाकरांना आनंद घेता येणार आहे.

या कार्यक्रमाला डॉक्टर जितेंद्र खेर यांच्या माउंटन रेज कंपनीचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. या कार्यक्रमात एस डी आणि आर डी यांची लोकप्रिय गाणी गायिका अमृता, संध्या व गायक यशवंत, रुदय, अमर आपल्या सुरेल आवाजात सादर करणार आहेत. आकाशवाणीच्या आरजे पद्मजा बापये या कार्यक्रमाचे रंजक आणि खुसखुशीत निवेदन करत बर्मन यांचा संगीतमय जीवनप्रवास उलगडून सांगणार आहेत. कार्यक्रम शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४ ला संध्याकाळी ५.४५ ते ८.३० या वेळेत चित्तपावन ब्राह्मण संघ येथे होणार आहे.