नवी मुंबई : स्वरगंगेच्या काठावरती, शुक्रतारा मंदवारा, वारा गायी गाणे, धुंदी कळ्यांना, मल्हारवारी मोतीयानं द्यावी भरुन, अहो मला लागली कुणाची उचकी, आला आला वारा, राणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय, जयोस्तुते श्री महन्मंगले… या आणि अशा एकाहुन एक अवीट श्रवणीय भावगीत, चित्रपट गीतांनी नवी मुंबईकरांचा गुढीपाडवा संस्मरणीय झाला. निमित्त होते वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात पार पडलेल्या ‘स्वरगंध महाराष्ट्रा’चा या अभिजात संगीताचा आस्वाद देणाऱ्या वाद्यवृंदाचे.
प्रदीप नायर यांची संकल्पना व सुरज दास यांचे दिग्दर्शन तसेच विशाल सकपाळ यांच्या संगीत नियोजनाखाली सादर करण्यात आलेल्या या सुरेल कार्यक्रमातील गाण्यांनी श्रोत्यांना तीन तास वेगळ्या वातावरणात नेऊन ठेवले. डॉ, धनश्री सरदेशपांडे, मधुरा वालावलकर, आशा क्रिष्णा यांच्यासह मंदार जोशी, सुरेश बोभाटे व सुरज दास यांनी मराठी चित्रपटांतील गीते तसेच भावगीते अत्यंत सुरेख पध्दतीने सादर करुन रसिकांना तृप्त केले. या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या नेत्रा गुजराती आणि सहकारी तसेच अभिषेक यांचा सत्कार मध्यंतरात करण्यात आला.
याप्रसंगी लेखक पत्रकार राजेंद्र घरत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विविध नामांकित मराठी वाद्यवृंदांचे कार्यक्रम काळाच्या ओघात बंद पडले. अशा वेळी ‘स्वरगंध महाराष्ट्रा’चा या कार्यक्रमाने आम्हाला आकाशवाणी, दूरदर्शन व वाद्यवृंदांनी समृध्द केलेल्या गीतांच्या रम्य युगात नेले. साहित्य मंदिर सभागृहात मराठीतील नामांकित साहित्यिकांनी कार्यक्रम केल्याची स्मृती जागी करुन येथेच या वाद्यवृंदाचा कार्यक्रम साजरा होत असताना आम्हा साऱ्यांना साक्षीदार होता आले याचा आनंद व्यक्त करत घरत यांनी वादक, कलावंत यांचे कौतुक केले आणि सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन प्रतिसाद दिला.