ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना मृदगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर !
मुंबई:लोककलेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या आवाजाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात आपली मोहिनी पसरवली होती. त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत. आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा देत १४ व्या स्मृती दिनानिमित्त याहीवर्षी १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे सायंकाळी ६:०० वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री रोहिणी हटट्गंडी , कालनिर्णय संपादक जयराज साळगावकर, ठाणे अतिरिक्त आयुक्त संदिप माळवी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या समारोहाच्या माध्यमातून कलेच्या विविध क्षेत्रातील कलावंत आपल्या सादरीकरणातून लोकशाहीर विठ्ठल उमपांना सांगितिक मानवंदना देणार आहेत. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानपूर्वक विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’२०२४ प्रदान करण्यात येणार आहे. यंदाच्या या पुरस्काराचे मानकरी पुरुषोत्तम बेर्डे (जीवनगौरव), ज्ञानेश महाराव (लेखक व पत्रकार), सुरेखा पुणेकर (लोककला क्षेत्र), श्रीगौरी सुरेश सावंत (सामाजिक क्षेत्र), आदेश बांदेकर (आभिनय व सूत्रसंचालक), सुचित्रा बांदेकर (अभिनेत्री आणि निर्माती), रोहित राऊत (नवोन्मेष प्रतिभा- संगीत क्षेत्र), दीपाली देशपांडे (क्रीडा क्षेत्र) ही मान्यवर मंडळी आहेत. शाल, पुष्प पुस्तक, मानपत्र आणि विठ्ठल उमपांची प्रतिकृती आसलेले मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. विशेष म्हणजे विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे काही बॅकस्टेजच्या कलाकारांना आर्थिक सहकार्याचा हात देत सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न विठ्ठल उमप यांचे चिरंजीव नंदेश उमप करणार आहेत.
बाबांकडून लाभलेला कलेचा वारसा पुढे घेऊन जात असतानाच आनंदाच्या नवनव्या वाटा गवसल्या असं प्रतिपादन नंदेश उमप यांनी केले. कला आपल्यासोबत एक संवेदना, उत्साह आणि ऊर्जा आणते. पिढ्यानपिढ्या जपलेला कलेचा वारसा आपल्या जीवनाचा व संस्कृतीचा अर्थ आहे. विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचा सत्कार करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे गायक नंदेश उमप यांनी यावेळी सांगितले.
या सोहळ्यात रंगारंग कार्यक्रम रंगणार असून तौफिक कुरेशी (झेंबे) वादक आणि गृप, पं. विजय चव्हाण आणि ग्रुप (महाराष्ट्राची वाद्य) यांच्या सुमधुर संगीताची मेजवानी उपस्थितांना घेता येणार आहे. तसेच श्रीमती सितारादेवी व नटराज गोपीकृष्ण यांचे वंशज विशाल कृष्णा यांच्या कथ्थक नृत्याचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता येणार आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा डॉ. समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत.