मुंबई: दादरस्थित ब्राह्मण सेवा मंडळाच्या १०० व्या वर्धापनदिनी दिनांक १० डिसेंबर २०२५ ला ब्रह्मभूषण पुरस्कार प्रदान सोहळा मंडळाच्या वास्तूत संपन्न झाला. यंदा माजी लोकसभा अध्यक्षा व पद्मभूषण सुमित्रा महाजन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलेल्या ज्ञातीतील व्यक्तीस दिला जातो. आता पर्यंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. आर.डी. लेले, लेफ्टनंट जनरल शेकटकर व डॉ. जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आला आहे.
नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षा अशी त्यांची राजकीय वाटचाल होती. तसेच सलग ८ वेळा एकाच मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व सर्वात जास्त काळ लोकसभा सदस्य असणार्या एकमेव महिला सांसद अशा ‘इंदूरच्या ताईंचे’ जीवन खूपच प्रेरणादायी ठरले आहे. मंडळाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध गोडसे यांच्या हस्ते महावस्त्र, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व अर्पणराशी सुमित्रा महाजन अर्पण करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनयजी सहस्रबुद्धे उपस्थित होते. त्यांनी सुमित्रा महाजन यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा आढावा घेतला. त्यांच्या नवनवीन गोष्टी शिकण्याच्या जिज्ञासू स्वभावाचा आवर्जून उल्लेख केला.
सुमित्रा महाजन यांनी सन्मानाला उत्तर देताना त्यांच्यावर लहानपणापासून आई वडिलांच्या व अनेक मान्यवरांच्या सहवासात झालेल्या संस्कारांचा संपूर्ण वाटचालीत कसा उपयोग झाला व त्याचेच फलित म्हणजे आजचा दिवस असे नम्रपणे नमूद केले. या कार्यक्रमाला यावेळी ब्राह्मण सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह योगेश केळकर, कार्यकारी विश्वस्त दिलीप शेटे, कार्याध्यक्ष अजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम या गीताने झाली.