मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेल्या कलर्स मराठीवरील दोन गाजलेल्या मालिका— पिंगा गं पोरी पिंगा आणि अशोक मा.मा. या दोन मालिकांनी नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. या प्रवासात या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभले आहे. दोन्ही मालिकांच्या सेटवर संपूर्ण crew सोबत केक कट करून आनंद साजरा करण्यात आला.
‘अशोक मा.मा.’ या मालिकेत मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ मुख्य भूमिकेत झळकत असून, त्यांच्यासोबत रसिका वाखारकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेने कौटुंबिक नातेसंबंध, प्रेमळ मामा, नातवंडांवरील त्यांचे प्रेम आणि त्याच्या भावविश्वाची मनोवेधक कहाणी सादर केली आहे.
तर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत ऐश्वर्या शेटे, आकांक्षा गाडे, शाश्वती पिंपळीकर, प्राजक्ता परब आणि विधीषा म्हसकर या अभिनेत्रींनी आपल्या दमदार अभिनयाने ही मालिका प्रेक्षकांच्या हृदयात घर करून गेली आहे.
१०० भागांचा हा यशस्वी टप्पा पार करताना, संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित झाला. मालिकांच्या पुढील प्रवासासाठी प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याची साथ अशीच लाभत राहो अशी मनोकामना मालिकांच्या संपूर्ण टीमने केली.