प्रदर्शनात देशातील १० नामवंत प्रवास व माध्यम छायाचित्रकारांची ७५ उत्कृष्ट छायाचित्रे
मुंबई:‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या विविधांगी सौंदर्याचे आणि अनुभवसमृद्ध पर्यटन स्थळ म्हणून असलेल्या आकर्षणाचे दर्शन घडवणारे ‘लेन्सकेप केरळ’ हे अखिल भारतीय छायाचित्र प्रदर्शन आज येथे जहांगीर आर्ट गॅलरीत केरळ पर्यटन विभागातर्फे सुरू करण्यात आले.
प्रसिद्ध चित्रपट निर्माती व छायाचित्रकार सूनी तारापोरेवाला यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देशातील १० आघाडीच्या प्रवास व माध्यम क्षेत्रातील छायाचित्रकारांनी केरळमध्ये टिपलेली ७५ निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात सादर करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे क्युरेशन प्रख्यात कला समीक्षक व क्युरेटर उमा नायर यांनी केले असून, नामांकित वन्यजीव व संवर्धन छायाचित्रकार बालन माधवन हे फोटोग्राफी संचालक आहेत. उद्घाटनानंतर उमा नायर यांनी अमित पासरीचा, ऐश्वर्या श्रीधर, नताशा कार्टर हेमराजानी, सौरभ चॅटर्जी आणि मनोज अरोरा यांच्यासह प्रदर्शनाची पाहिले.
केरळला केवळ पर्यटन स्थळ म्हणून अधोरेखित करण्यापलीकडे जाऊन, हे प्रदर्शन राज्याचे निसर्ग, संस्कृती आणि स्मृती यांचे जिवंत दर्शन घडवते. हे प्रदर्शन १५ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी ११:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
केरळचे पर्यटन मंत्री पी. ए. मोहम्मद रियास यांनी आपल्या ऑनलाइन संदेशात म्हटले आहे, ‘या महानगराशी केरळचे दीर्घ आणि दृढ नाते आहे. अशा या महानगरात आपल्या भूमीची ऊब आणि चैतन्य घेऊन येणारे हे व्यासपीठ आम्हाला सादर करताना आनंद होत आहे. ‘लेन्सकेप केरळ’ राज्याच्या सांस्कृतिक वैविध्याचा आणि बहुविधतेचा उत्सव साजरा करते.’
ते पुढे म्हणाले, ‘जागतिक स्तरावर मान्यता मिळालेल्या पर्यटन स्थळ म्हणून केरळवर नव्याने लक्ष केंद्रीत करण्याबरोबरच, हे प्रदर्शन पर्यटकांना जंगल, डोंगर, बॅकवॉटर, धार्मिक स्थळे आणि सण-उत्सव यांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शक ठरते. हे सर्व केरळला अनुभवसमृद्ध पर्यटन स्थळ बनवतात.’ गेल्या डिसेंबरमध्ये ‘लेन्सकेप केरळ’साठी योगदान देणाऱ्या छायाचित्रकारांनी पाच दिवस केरळमधील विविध भागांचा प्रवास केला. त्यांनी निसर्ग, वन्यजीव, वारसा, ग्रामीण व किनारी जीवन, वास्तुकला, सण आणि अध्यात्म अशा विविध विषयांवर छायाचित्रण केले.आजच्या काळात प्रवासी अधिक समृद्ध आणि अनुभवप्रधान पर्यटन शोधत असताना, ‘लेन्सकेप केरळ’ ही एक अभिनव संकल्पना असून राज्याच्या दृश्य वैभवाचे प्रभावी दर्शन घडवते.
प्रदर्शनाच्या निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत मास्टर क्लासचे आयोजनही करण्यात आले होते.
उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेल्या पाच छायाचित्रकारांव्यतिरिक्त एच. सतीश, कौंतेय सिन्हा, शिवांग मेहता, सैबल दास आणि उमेश गोगना यांनीही या प्रदर्शनासाठी योगदान दिले आहे.मुंबईनंतर हे प्रदर्शन पुणे (१८–२० फेब्रुवारी), बेंगळुरू (२७ फेब्रुवारी–१ मार्च), चेन्नई (४–७ मार्च), हैदराबाद (१२–१४ मार्च), कोलकाता (२२–२४ मार्च) आणि शेवटी सुरत (२९–३१ मार्च) येथे भरविण्यात येणार असून ३१ मार्चला त्याची सांगता होईल.