मुंबई: ज्येष्ठ कवी रामचंद्र परब यांच्या ‘विरंगुळा’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ५ एप्रिल रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर माजी गृहराज्य मंत्री बाळा नांदगावकर, चित्रपट दिग्दर्शक, लेखक केदार शिंदे,माजी मोटार वाहन विभाग आयुक्त डी.जी. जाधव, लेखक-पत्रकार राजेंद्र घरत उपस्थित होते.
आपण गेली अनेक वर्षे परब यांना ओळखत असून त्यांनी विविध विषयांवर कविता केल्या आहेत. विषयांचे वेगळेपण दर्शवणे, सर्वसामान्यांना भावणाऱ्या कविता लिहीणे ही त्यांची आवड असून त्यांनी याहीपुढे काव्यलेखनात सातत्य ठेवावे अशा शब्दात नांदगावकर यांनी कविवर्यांना शुभेच्छा दिल्या. आपण लेखक, नाटककार झालो; कवी होणे काही जमले नाही असे आपल्या मनोगतात केदार शिंदे म्हणाले व कवितांमधील वैविध्यांबद्दल त्यांनी परब यांचे कौतुक केले.
लेखक-पत्रकार राजेंद्र घरत यांनी कवि परब यांच्या अनेक कविता, पत्र, लेख आपण संपादित करत असलेल्या अंकांमधून प्रसिध्द केल्याच्या स्मृती आपल्या भाषणातून यावेळी जागवल्या व पराकोटीचा साधेपणा; निष्पाप, निरागस वागणे व प्रसंगी पसरट वाटले तरी अगत्याचे, विनम्र बोलणे व तन्मयतेने लिहीणे याचे आपणास आकर्षण असल्याची भावना मांडली. कवी परब यांनी ज्या राज्य मोटार वाहन विभागात काम केले तेथील माजी आयुक्त डी. जी. जाधव यांनी कवी परब ही तरल, कविमनाची व्यक्ती आमच्यासारख्या रुक्ष-व्यवहारी विभागात काम करण्यास ‘अनफिट’ असल्याचे मजेशीर निरीक्षण नोंदवत त्यांनी नोकरीत असताना व आताही जे संवेदनशील मन, तरल वृत्ती जोपासली आहे याकडे लक्ष वेधून परब यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन परब कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याातील बांभुळी गावचे अनेक हितचिंतक तसेच मुंबईत माझगाव येथे त्यांच्या वास्तव्यात जोडलेले शेजारी, परिवहन विभागातील नोकरीतील सहकारी, ठाणे, मुंबई-नवी मुंबई, पनवेल परिसरातून आलेले अनेक रसिक, श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वैशाली केतकर यांनी केले.