मुंबई: दक्षिण मुंबईच्या सांस्कृतिक जीवनातील एक प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखले जाणारे ‘रविकिरण मंडळ, डिलाईल रोड, परळ’ आणि ‘ग्रंथाली प्रतिभांगण’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य स्पर्धेत सहभागी शाळा व संस्थांच्या लेखक, कलावंत आणि मार्गदर्शकांसाठी लेखन मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच ग्रंथाली प्रतिभांगण, बँडस्टँड, वांद्रे, मुंबई येथे संपन्न झाली. बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या नवोदित लेखक-दिग्दर्शकांना व्यावसायिक दर्जाचे लेखन आणि सादरीकरणाचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
‘रविकिरण मंडळ’ हे गेल्या सहा दशकांपासून क्रीडा आणि कलावंतांसाठी आशेचे किरण ठरले आहे. बालनाट्य क्षेत्रातील प्रतिभा विकसित करण्यासाठी संस्था मागील ३८ वर्षांपासून सातत्याने बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करत आहे. मुंबई व उपनगरातील अनेक शाळा व संस्थांचा या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत असून, बालकलाकारांच्या अभिनयासोबतच त्यांचा सर्जनशील लेखनकौशल्याचा विकास करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
या कार्यशाळेत प्रख्यात लेखक अभिजित गुरु (नाट्य व मालिका लेखक), बहुआयामी लेखिका-अभिनेत्री शर्वरी पाटणकर, तसेच ‘दशावतार’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सहभाग घेतला. तिघांनीही लेखनातील कल्पकता, पात्रनिर्मिती, कथानकाची रचना आणि संवादलेखनातील बारकावे या विषयांवर उपस्थित सहभागींचे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे बालनाट्य क्षेत्रातील नवोदित लेखक-दिग्दर्शकांना प्रेरणा मिळाली असून, पुढील पिढीतील सर्जनशील कलावंत घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या : https://ravikiranmandal.com