‘स्वाधार’चा प्रकल्प ‘रेज ऑफ होप’

सुनंदा टिल्लू

भोलीभली मतवाली आंखोंमें क्या है?
आंखोंमें है उम्मीदोंकी निशानी
आनेवाली दुनिया का सपना सजा है
नन्हेमुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमे क्या है
मुठ्ठीमे है तकदीर हमारी!!”

हे गीत आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण हे सगळ्या मुलांना लागू होत का? सगळ्या मुलांना भविष्याच्या स्वप्नाची उमेद ठेवता येते का? खासकरून ज्या मुलांना एचआयव्हीसारख्या (HIV) रोगाबरोबर झगडावं लागत आहे?

स्वाधारचा रेज ऑफ होप (Rays of Hope) प्रकल्प गेली २० वर्षे याच मुलांबरोबर काम करत आहे, त्यांना सक्षम बनवून , मानाने आयुष्य जगायला शिकवीत आहे. जून २००५ मध्ये Save the children Canada & UK यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या रेज ऑफ होप प्रकल्पाला जून २०२५ मध्ये २० वर्षे पूर्ण झाली. प्रकल्पामध्ये एचआयव्ही बाधित (infected) आणि एचआयव्ही प्रभावित(पालक बाधित पण मुलांना एचआयव्ही नाही.) अशी दोन्ही प्रकारची मिळून एकूण २३० मुले आहेत. यातील बहुतक मुलांचे वडील एड्सने (AIDS) मृत्यू पावले असून एचआयव्ही बाधित आया आणि मुले जगण्याची धडपड करीत आहेत. २३० मधली ४० मुले पोरकी झाली असून आजी आजोबा, काका, मामा यांच्या बरोबर राहत आहेत. प्रकल्पामध्ये येण्याआधी काही मुलांवर बाल कामगार म्हणून काम करण्याचीही वेळ आली होती.
प्रकल्पातील बरीच मुले अती कुपोषित म्हणजे SAM (Severely acute mslnourished) आणि मध्यम कुपोषित(Moderately acute mslnourished) गटात मोडतात.

कुपोषणामुळे संधिसाधू आजारांशीही यांना लढावे लागते. ह्यावर मात करण्याचा एक उपाय म्हणजे ह्या मुलांना, पर्यायाने त्यांच्या कुटुंबाला दर महिन्याला प्रथिनयुक्त धान्याचा शिधा देणे. ह्यामध्ये वेगवेगळ्या डाळी, कडधान्ये, गहू, ज्वारी, गूळ, शेंगदाणे, राजगिरा लाडू, खजूर, नाचणी सत्व, अंडी, दूध पावडर, तेल, तूप वगैरे वेगवेगळ्या वस्तू पुरविल्या जातात. पालकांना ह्या सगळ्या वस्तू कशा वापरायच्या याविषयी मार्गदर्शन केले जाते आणि त्यासाठी कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. ह्या सर्व प्रयत्नांचे फलित आज दिसत आहे. मुलांची वजने, उंची वाढत आहे, त्यांचे BMI सुधारत आहे. ती कमी आजारी पडत आहेत, त्यांची शाळेतील उपस्थिती सुधारली आहे , अभ्यास सुधारला आहे. १९० मुले शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहून. समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून मानाने राहू लागली आहेत. १३० मुलांची लग्न झाली असून ती गृहस्थाश्रमात स्थिरावली आहेत.रेज ऑफ होपच्या (Rays of Hope) मुलांची प्रगती बघून ऊर अभिमानाने भरून येतो. आपले

ध्येय काही प्रमाणात का होईना साकार झाल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे.या मुलांबरोबर काम करताना असे लक्षात आले की कुपोषण हे फक्त ह्या मुलांच्या नसून वंचित वर्गातील इतर मुलेही कुपोषित आहेत. रेज ऑफ होपच्या टीमने ग्रामीण भागात, आदिवासी वस्त्यांमधील मुलांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कामशेत जवळ नाणे गावात जिल्हा परिषदेच्या ७ शाळांतून १५० मुलांना २०२३ पासून दर महिन्याला शिधा पुरविण्यात येत आहे.त्याही मुलांची उत्तम प्रगती होत आहे.

रेज ऑफ होपच्या टीमचे आपल्याला नम्र आवाहन आहे, आपणही ह्या उपक्रमात सामील व्हावे. मुलांना या ना त्या मार्गाने मदत करावी.त्यांच्या शिक्षणाची, औषधांची किंवा शिध्याची जबाबदारी उचलावी. या मुलांच्या जीवनात आशेचे किरण रेज ऑफ होपच्या आणावेत.

संपर्क :
रेज ऑफ होप,पुणे (ROH, PUNE)
८३९००८३५९६
रेज ऑफ होप,पिंपरी चिंचवड महानगरपालिका (ROH,PCMC)
९८३८०२७८४