अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात ‘ऋणानुबंध@२५’चे आयोजन

मुंबई: अंधेरीच्या विद्या विकास मंडळ विद्यालयात ‘ऋणानुबंध@२५’चे आयोजन करण्यात आले. वर्ष २०००च्या माजी विद्यार्थ्यांनी २५ वर्षांनी एकत्र येऊन शाळेचे ‘ऋणानुबंध’ कृतज्ञतेच्या सामाजिक बांधिलकीने जपले. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा कल्पक सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुजनांचे पाद्यपूजन , कृतज्ञता सत्कार, गुरूंची आशीर्वचने, कविता, गाणी अशा अनेक आनंदक्षणांनी हा सोहळा हृदयस्पर्शी झाला. विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया लटके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नंदा धुमाळ, माजी मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका यांच्यासह ३० ज्येष्ठ शिक्षक आणि कर्मचारी यांचा सत्कार माजी विद्यार्थ्या़ंनी केला.

मराठी शाळेचे संस्कारक्षम दर्जेदार आधुनिक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटीबद्ध असलेला विद्या विकास परिवार यावर आधारित लघुचित्रपट या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला. माजी विद्यार्थ्यांचा शालान्त परीक्षा वर्ष २००० चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम ऋणानुबंध @२५ च्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना अग्नी सुरक्षितता म्हणजे फायर फायटिंगचे प्रशिक्षण आणि ‘अवकाशाची भटकंती’द्वारे (मोबाईल प्लॅनिटोरीयम) फिरत्या आभासी तारांगणाचा अनुभव दिला आहे. तसेच माजी विदयार्थी शाळेच्या विद्यार्थ्यांना चित्रकला, संगीत, गायन, नृत्य आदींसाठी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून मार्गदर्शन करतात. शाळेतल्या विद्यार्थ्या़ंसाठी वैद्यकीय शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.

‘मातृभाषेतून शिक्षण महत्त्वाचे आहे. आमच्या शाळेचे उदाहरण द्यायचे झाले, तर आमच्या शाळेत ब्रेन चार्जिंग लॅब, रोबोटिक्स वर्ग, संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत ग्रंथालय, डिजिटल रुम, इ-लर्निंग आणि परिपूर्ण शिक्षक वर्ग जो पोटतिडकीने ज्ञान मुलांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही गोष्टीत आम्ही मागे नाही, म्हणाल तर थोडेसे आम्ही सरसच आहोत. याचा आम्हाला अभिमान आहे. आज आमचे माजी विद्यार्थी आम्हाला भेटायला येतात आणि सांगतात आम्ही या पदावर काम करतो. खरोखर त्या मुलांपेक्षा जास्त अभिमान आम्हाला त्यांचा वाटतो. आजच्या आमच्या मुलांसाठी आमचे माजी विद्यार्थी त्यांचे आदर्श आहेत. वेगळे आदर्श प्रस्थापित करण्याची गरजच नाही. मातृभाषेतून मुलांचा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व विकास होतो, हे जगभरातील अनेक राष्ट्रे ज्यांनी मातृभाषेची कास धरली आहे, त्या सर्व राष्ट्रांनी हे सिद्ध केलेले आहे.’ असे विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया लटके यांनी सांगितले.

शिक्षक, विद्यार्थी, मित्र परिवार आणि कार्यकारी मंडळ ह्या सर्वांना जोडून ठेवणारा हा “ऋणानुबंध@२५” अतिशय संस्मरणीय झाला.