वंचितांसाठी ‘अभ्यासाच्या नावानं’ नाटकाचे नाट्यप्रयोग…

पुणे: देवदत्त पाठक यांच्या गुरु स्कूलच्या वतीने वंचितांसाठी ‘अभ्यासाच्या नावानं’ या नाटकाचे नाट्यप्रयोग सादर होत आहे
वंचित, आजारग्रस्त मुले मोकळेपणाने नाट्यगृहामध्ये जाऊन नाटक बघू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ते जिथे राहतात अशा आश्रम शाळा व संस्था येथे जाऊन प्रा.देवदत्त पाठक आणि त्यांची गुरुस्कूल विद्यार्थ्यांची टीम ‘अभ्यासाच्या नावानं’ या मुलांसाठी खास बनवलेल्या नाटकाचे प्रयोग करत आहे. स्वाधार, रेज ऑफ होप , अक्षरदीप आणि अनेक सामाजिक संस्थांसाठी या नाटकाचे प्रयोग गुरुस्कूलचे विद्यार्थी अर्णव देशपांडे, मल्हार बनसुडे ,गौरी पत्की, धनश्री गवस करत आहेत.’अभ्यासाच्या नावानं’ या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन देवदत्त पाठक यांचे आहे, तर प्रमुख सहाय्यक दिग्दर्शन मिलिंद केळकर यांनी केले आहे, दर्शन पोळ ऋतुजा केळकर उषा देशपांडे यांचे निर्मिती सहाय्य यासाठी लाभले आहे.

आज काल अभ्यासाच्या नावाखाली मुलं कुठे कुठे जाऊन काय काय करतात , वेपिंग आणि सुसाईडींगचे त्यामध्ये प्रमाण वाढत आहे, त्या मागची त्यांची असलेली मानसिकता याबद्दल काळजीचे वातावरण आहे, पालकांचे मुलांकडे परिस्थितीमुळे नसलेले लक्ष आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न यावरती या नाटकाची गोष्ट तयार झालेली आहे. खाणे, पिणे, धमाल करणे, मस्त राहणे आपल्या तंद्रीत ,विश्वात रमणे यामुळे होणारी मुलांची वाईट अवस्था आणि त्यावरती निर्माण केलेले उपाय याला या नाटकामध्ये प्राधान्य दिले आहे. दोन मित्र अर्णव आणि मल्हार यांचा अभ्यासाच्या नावाने चाललेला धुमाकूळ आणि त्यातून घडणारी विचित्र घटना यातून त्या दोघांना होणारी जाणीव या विषयावरचे हे नाटक सगळ्यांनाच अंतर्मुख करते.विशेष म्हणजे जेवढा वेळ अभ्यास तेवढेच हे अभ्यासाचे नाटक अशी या नाटकाची गंमत आहे .

मुलांचे नाटक हे मुलांच्या भाव विश्वातले ,अनुभव विश्वातले असावे आणि त्याचे नाट्यगृह बरोबरच, घरी दारी, सहकारी गृहनिर्माण संस्था ,सामाजिक संस्थांमध्ये जाऊन प्रयोग होणे गरजेचे आहे ,त्यामुळे बाल आणि कुमार रंगभूमी ही अधिक विकसित होईल आणि सर्वांपर्यंत पोहोचेल ,असे मत प्रा.देवदत्त पाठक यांनी यानिमित्ताने केले आहे.