दरवर्षीप्रमाणे यंदाही जर्मनीत ‘आयटीबी बर्लिन २०२३’ तर्फे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पर्यटन उद्योगाला जागतिक पातळीवर चालना देण्यासाठी प्रतिष्ठित ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यात राज्याच्या पर्यटन विभागाने सहभाग घेतला होता. यावर्षी ‘आयटीबी बर्लिन’ व्यापार मेळाव्यामध्ये जवळपास १६१ देश तसेच १०,००० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी सहभाग नोंदवला. त्याठिकाणी वैभवशाली संस्कृती, समृद्ध इतिहास, निळे समुद्रकिनारे असलेल्या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये सर्वांसमोर मांडण्यात आली.
यावर्षी आयटीबी बर्लिन ‘एमटीडीसी’ चा ‘महाराष्ट्र पर्यटन स्टॉल’ संपूर्ण आयटीबीचा केंद्रबिंदू राहिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव घेता यावा यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्यप्रकार, लावणी या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. अभिनेत्री लावणीसम्राज्ञी करिश्मा वाबळे हिने आपल्या धमाल लावणी सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे आयोजन स्टारक्राफ्ट एंटरटेनमेंट प्रा.लि. चे संचालक संतोष मिजगर यांनी केले होते. या कार्यक्रमात बॉलीवूड पार्क, वीणा वर्ल्ड, स्वदेश ट्रॅव्हल्स, कॅप्टन निलेश गायकवाड, डेक्कन ओडिसी, गोवर्धन इको व्हिलेज हे सह-प्रदर्शक म्हणून सहभागी झाले होते.