मुंबई: अमृता खानविलकर… अभिनेत्रीसह अमृता एक उत्तम नृत्यांगनादेखील असल्यामुळे तिने सादर केलेली अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. अमृताने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहे आणि यावेळी सुद्धा सुबोध भावे दिग्दर्शित आगामी ‘संगीत मानापमान” चित्रपटात ती पुन्हा एकदा आपली कला सादर करणार आहे.
चित्रपटात असलेलं सुरेख गाणं “वंदन हो” मध्ये आपण अमृता खानविलकरला सेमी क्लासिकल डान्स करताना पाहू शकतो. अमृता ही शास्त्रीय नृत्य करण्यात माहीर आहे तिने खूपच मोहमयी नजाकतीने या गाण्यात नृत्य केलय. ट्रेलरमध्ये तिची एक झलक पाहूनच तिचे चाहते खूप उत्सुक होते. तिची अदा पाहून सर्वच तिच्यावर फिदा होतात यात काही शंका नाही. चित्रपटातील “वंदन हो” गाण्याला आणखी सुरेख बनवलं ते म्हणजे कोरिओग्राफर दीपाली विचारे यांनी. मध्यप्रदेशच्या ओरछा येथे हे संपूर्ण गाणं दोन दिवसांत शूट झालंय.
अमृताने वंदन हो गाण्याबद्दल आपलं मत मांडताना सांगितलं “वंदन हो हे माझं गाणं संगीत मानापमानची भव्यता उत्तम प्रकारे कॅप्चर करतं. हे गाणं एक व्हिज्युअल ट्रीट आहे. माझ्या आणि दीपाली विचारे आम्हा दोघांचा उत्कृष्ट असा सुपरहिट गाण्याचा इतिहास आहे. कारण तिने चंद्रमुखी मधील चंद्रा देखील कोरिओग्राफ केलं आहे, जे ३ ते ४ वर्षानंतर देखील गाजतंय आणि पुढे ही गाजणार आणि आता ‘मानापमान’सारख्या संगीतमय चित्रपटामुळे मला दीपा ताईच्या हाताखाली खूप काही शिकायला मिळालंय, ती कथ्थकची उस्ताद आहे आणि तिने जे वंदन हो गाण्यामध्ये केलय ते पूर्णपणे आश्चर्यकारक आहे. गाण्यात मध्य प्रदेशातील सुंदर लोकेशन आणि आम्ही चित्रित केलेला राजवाडा अगदी थक्क करणारा आहे. नचिकेत बर्वे नी गाण्याचे कॉस्ट्यूम डिझाईन केलेत जे अप्रतिम आहे. तसेच गाण्याचे सिनेमॅटोग्राफर सुधीर भालानी ह्यांनी सुद्धा कायम लक्षात राहील असं काम केलय”
‘संगीत मानापमान’ चित्रपटाविषयी बद्दल सुद्धा अमृता म्हणाली की, ‘संगीत मानापमानचा भाग होणे आणि शंकर एहसान लॉयच्या म्युझिकसाठी सोलो परफॉर्म करणे म्हणजे कट्यार काळजात घुसलीच्या सर्व आश्चर्यकारक आणि अद्भुत आठवणी परत आणते. तीच टीम आहे आणि सुबोध कट्यारनंतर पुन्हा दिग्दर्शन करत आहे. त्याने मला या चित्रपटासाठी विचारलं ज्यात तो केवळ दिग्दर्शनच नाही तर त्यात अभिनय देखील करत आहे, त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी अद्भुत, खास आणि हृदयाच्या जवळ आहे त्यात जिओ स्टुडिओज सिनेमा प्रोड्युस करत असल्यामुळे माझा गेस्ट अपिअरन्स आणखी स्पेशल झालाय.”
इतकंच नव्हे तर दिग्दर्शक, अभिनेता आणि खास मित्र सुबोधबद्दल सुद्धा अमृताने सांगितलं, ‘सुबोध मला त्याच्या कोणत्याही चित्रपटात काम करण्याबद्दल विचारतो तेव्हा मी कधीच नाही म्हणू शकत नाही, कारण त्याने मला सुमारे ७ ते ८ वर्षांपूर्वी कट्यार काळजात घुसली दिलं होतं, जो सर्वात उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. त्याचं आणि माझा बॉण्ड घट्ट आहे. तो मला नेहमी असं काम देतो जे माझ्या करिअर साठी नक्कीच एक पाऊल पुढे असतं.’
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. ‘संगीत मानापमान’ १० जानेवारी २०२५ पासून जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.