तलवारबाजीत महाराष्ट्राने ४ सुवर्ण, ३रौप्य, २ कांस्य पदके पटकावत केला सुवर्ण समारोप !

जबलपूर : महाराष्ट्र पुरुष आणि महिला खेळाडूंनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत शुक्रवारी तलवारबाजी स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. महिला संघाने इप्पी गटाच्या सांघिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. अनुजा लाड, माही अरदवाड, गायत्री कदम आणि जान्हवी जाधव यांनी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्र संघाने अंतिम फेरीमध्ये यजमान मध्य प्रदेशच्या संघाला धूळ चारली. तसेच निखिल वाघ, हर्षवर्धन औताडे, आदित्य वाहुळ आणि श्रेयस जाधव यांनी सर्वोत्तम कामगिरी सेबरच्या सांघिक गटात सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. संघाने अंतिम फेरीत जम्मू कश्मीरचा पराभव केला.
आंतरराष्ट्रीय खेळाडू निखिल वाघ, श्रेयस जाधव, अनुजा लाड, माही, कशिश, जान्हवी यांनी महाराष्ट्र संघाला खेलो इंडिया च्या पदार्पणात तलवारबाजी खेळ प्रकारात जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्र संघाने पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या तलवारबाजीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत नऊ पदकांची कमाई केली. यामध्ये ४ सुवर्ण, ३रौप्य, २ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्र संघाने मुख्य प्रशिक्षक स्वप्निल तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादन केले.

पदार्पणात सोनेरी यश कौतुकास्पद : चंद्रकांत कांबळे

आंतरराष्ट्रीय फेन्सर यांनी पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेल्या तलवारबाजी खेळ प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंची तलवारबाजीमधील पदार्पणातील ही कामगिरी कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी प्रचंड मेहनतीतून आपले वर्चस्व अबाधित ठेवत महाराष्ट्राला मोठे यश मिळवून दिले,अशा शब्दात पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे यांनी महाराष्ट्र तलवारबाजी संघाचे खास कौतुक केले.