त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपचे कमळ फुलणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

आगरतळा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिष्मा देशभर असून त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत पुन्हा दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलणार आहे,असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. धनपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बोलत होते. त्रिपुरामध्ये भाजपला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असून प्रतिमा भौमिक यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे त्रिपुरा राज्य अध्यक्ष सत्यजित दास उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्रिपुरामध्ये भाजप सरकारने चांगले काम केले आहे. त्रिपुरातील आदिवासी दलित अल्पसंख्यांक सर्व समाज घटकांना न्याय देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वात झाले आहे. भाजपच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष खंबीर उभा असल्याचे सांगत यंदा त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

भाजपला आणि आपल्या उमेदवारीला रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल धनपूरच्या भाजप उमेदवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी रामदास आठवले यांचे आणि रिपब्लिकन पक्षाचे जाहीर आभार मानले.