महाराष्ट्र ४४ सुवर्ण, ४९ रौप्य आणि ४० कांस्य अशा १३३ पदकांसह अव्वल स्थानी !

● सायकलिंगमध्ये पूजाला रौप्य, मुली सांघिक विजेत्या
● जलतरणात वेदांतचे तिसरे सुवर्णपदक
● कबड्डीत मुलींची शर्थीची झुंज अपयशी
● भारोत्तलनामध्ये (वेटलिफ्टिंग) सानिध्य मोरेला सुवर्ण
● ज्युडोमध्ये श्रद्धा चोपडेला सुवर्ण
● कुस्तीमध्ये समर्थ, वैभव, वैष्णवला रौप्य
● टेनिसमध्ये मधुरिमा सावंतला कांस्य पदक

भोपाळ/जबलपूर : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशाच्या भूमीत पदकांचा सपाटा कायम ठेवला. महाराष्ट्राच्या खेळाडंनी आज ५ सुवर्णपदकांसह एकूण १८ पदकांना गवसणी घालताना सर्वसाधारण विजेतेपदाच्या दृष्टिने भक्कम पाऊल टाकले.
महाराष्ट्राकडून आज वेदांत माधवनने जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळविले. वेदांतची स्पर्धेत तीन सुवर्णपदके झाली आहे. सायकलिंगमध्ये पूजाने अखेरच्या दिवशी देखिल रौप्यपदकाची कमाई करून सहा पदकांसह मोहिमेची यशस्वी सांगता केली. महाराष्ट्राची स्पर्धेत आतापर्यंत ४४ सुवर्ण, ४९ रौप्य, ४० कांस्य अशी १३३ पदके झाली आहेत. हरियाणाने कुस्ती कबड्डीतील यशाने दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत मध्य प्रदेशाला खूप मागे टाकले. हरियाणाची आता ३८ सुवर्ण, २५ रौप्य, ३५ कांस्य अशी ९८ पदके तर मध्य प्रदेशाची २८ सुवर्ण, १८ रौप्य आणि २७ कांस्य ७३ पदके झाली आहेत.

● जलतरण :
महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी सलग तिसऱ्या दिवशी आपल्या कामगिरीत सातत्य राखले. स्पर्धेत गुरुवारी वेदांत माधवन, भक्ती वाडकर, पलक जोशी, शुभंकर पत्की, प्रतिक्षा डांगी यांचा समावेश होता. मुलांच्या रिले चमूनेही आपले वर्चस्व राखले.

वेदांतने आज एकाच दिवशी दोन सुवर्ण एका रौप्यपदकाची कमगिरी केली. वेदांतने आज १०० मीटर फ्री-स्टाईल (५२.९७ सेकंद) शर्यतीत पहिले सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर दिवस अखेरीस ऋषभ दास, अर्जुनवीर गुप्ता, शुभंकर पत्की, वेदांत माधवन या रिले चमूने ३ मिनिट ५९.५७ सेकंद वेळ देत चार बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. वेदांतला १५०० मीटर फ्री-स्टाईल प्रकारात (४ मिनिट०९.६१ सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात शुभंकर पत्की (२७.९६ सेकंद) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या विभागात याच स्पर्धा प्रकारात भक्ती वाडकरने ३१.१४ सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळविले. प्रतिक्षा डांगी (३१.४० सेकंद) याच शर्यतीत ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. पलक जोशीने १ मिनिट ०.३७ सेकंद वेळ देत रौप्यपदक मिळविले.

● कबड्डी : कबड्डीत मुलींची शर्थीची झुंज
खेलो इंडिया स्पर्धेत कबड्डीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी हरियानाला दिलेली झुंज सर्वात कौतुकास्पद होती. साखळी लढतीत याच हरियानाकडून एकतर्फी हार पत्करणाऱ्या महाराष्ट्राच्या मुलींनी अंतिम लढतीत हरियानाला एका एका गुणासाठी झुंजवले. हरजित कौर आणि मनिषा राठोडच्या चढायांनी हरियानाच्या बचावफळीची कसोटी पाहिली. समृद्धि मोहितेने आपल्या खेळाची वेगळीच छाप सोडली. बचावात तिला थोडी साथ मिळाली असती, तर महाराष्ट्राने सुवर्णपदक जिंकले असते. अखेरीस महाराष्ट्राला या अंतिम लढतीत २९-३० अशी हार पत्करावी लागली.

● कुस्ती : समर्थ, वैभव, वैष्णवला रौप्य
महाराष्ट्राच्या मल्लांनी आज तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके मिळविली. ग्रीको रोमन विभागाता समर्थ म्हाकवे (५५ किलो), वैष्णव आडकर (६५ किलो), फ्री-स्टाईल विभागात वैभव पाटील (६० किलो) यांना अंतिम लढतीत हरियानाच्या प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. मुलींच्या ६१ किलो गटात पिंपरी-चिंचवडची प्रगती गायकवाज आणि भक्ती आव्हाड यांनी ब्रॉंझपदकाची कमाई केली.

● सायकलिंग : पूजाचा पदकांचा षटकार

कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सायकलिंगमधील आपले वर्चस्व कायम राखताना आज ६० कि.मी. रोडरेस शर्यतीत २ तास १३ मिनिट ४८.९४१ सेकंद वेळ देत रौप्य पदक मिळविले. या स्पर्धेत पूजाने तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी सहा पदके मिळविली. मुलींच्या संघाला सांघिक विजेतेपद मिळाले. महाराष्ट्राने सायकलिंगमध्ये ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली.

● ज्युडो : श्रद्धा चोपडेला सुवर्ण
ज्युडो प्रकारात महाराष्ट्राला श्रद्धा चोपडेने ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम लढतीत श्रद्धाने महाराष्ट्राच्याच आकांशा शिंदेचा पराभव केला. श्रद्धा सध्या भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय अकादमीत सराव करत आहे. मलींच्याच ५७ किलो वजन गटात कोल्हापूरपच्या समृद्धि पाटीलला उत्तराखंडच्या स्नेहा कुमारीकडून अंतिम लढतीत पराभव पत्करावा लागला.

● भारोत्तलन (वेटलिफ्टिंग) : सानिध्यला सुवर्ण
मुंबईच्या सानिध्य मोरेने ८९ किलो वजनी गटात आज सुवर्णपदकाची नोंद केली. त्यानेतर स्नॅचमध्ये १२५ किलो तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी उचलले. क्लिन -जर्क प्रकारात तिसऱ्या प्रयत्नांत १४९ किलो असे एकूण २७१ किलो वजन उचलून सानिध्यने सुवर्णपदक मिळविले. त्याने रिषभ यादव (उत्तर प्रदेश, १६२ किलो), अमन (गोवा, १६१) यांना खूप मागे टाकले.

● तलवारबाजी :
महाराष्ट्र महिला संघाला कांस्यपदक महाराष्ट्र संघाने तलवारबाजीमध्ये आज कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्र महिला संघ सेबर प्रकारातील सांघिक गटात कांस्य पदकाचा मानकरी ठरला. उपांत्य लढतीत महाराष्ट्राचा पराभव झाला. हरियाणा संघाने ४५-४३ अशी महाराष्ट्रावर मात केली. महाराष्ट्र महिला संघाकडून कशीश भराड (औरंगाबाद), गौरी सोळंके(बुलढाणा), प्रिषा छेत्री( रायगड) आणि शर्वरी गोसेवाड (नागपूर) यांची कामगिरी चांगली झाली.

● टेनिस :
टेनिसमध्ये महाराष्ट्राच्याच मधुरिमा सावंत आणि सोनल पाटील यांच्यात झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत मधुरिमाने बाजी मारली. मधुरिमाने सोनलचा ६-४, ६-० असा पराभव केला.