स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांवरील निबंध स्पर्धेला बंदिवानांमध्ये प्रारंभ !

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुंजवून स्वातंत्र्यलढ्यासाठी क्रांतिकारक तयार केले. आज वर्तमानात त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत बंदिवानांमधून भविष्यातील देशभक्त नागरिक घडावेत, यासाठी स्वातंत्र्यवीरांच्या विचारांवर आधारित निबंध स्पर्धेला रामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने प्रारंभ करण्यात आला आहे. हा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनापासून मे २०२३ पर्यंत त्यांच्या जयंतीदिनापर्यंत राज्यातील मध्यवर्ती कारागृहे, विशेष आणि जिल्हा कारागृहातील बंदिवानांसाठी राबविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच क्रांतिकारकारकांच्या विचारांवरील निबंध स्पर्धा रामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने अमरावती मध्यवर्ती कारागृह, सोलापूर जिल्हा कारागृह येथून सुरु करण्यात आला असून २ मार्च रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृह, त्यानंतर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह आणि राज्यातील अन्य कारागृहांमध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहेत. या उपक्रमासाठी रामचंद्र प्रतिष्ठानच्या संचालिका नयना शिंदे, ज्येष्ठ सदस्या मंदाकिनी भट, राष्ट्रपती पदक विजेत्या शोभा नाखरे तसेच मान्यवर परिश्रम घेत आहेत. ही स्पर्धा रामचंद्र प्रतिष्ठानच्या वतीने २०१८ पासून सलगपणे राज्यातील कारागृहांतील बंदिवानांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यात सर्व भाषिक महिला आणि पुरुष हजारोंच्या संख्येने सहभागी होत असतात.