जबलपूर : निर्विवाद वर्चस्वासाठी उत्सुक असलेले महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो खो संघांचे शनिवारी मोठ्या उत्साहात जबलपूरमध्ये आगमन झाले. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या बळावर सुवर्ण क्रांती घडवून जबलपूरमध्ये आपल्या संघाचे यश मिळण्यासाठी युवा खेळाडू सज्ज झाले आहेत.सोमवारपासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील खो-खोचे जबलपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे संघ दमदार सलामी देत आपल्या किताबाच्या मोहिमेला शानदार सुरुवात करण्यासाठी उद्यापासून मैदानावर उतरणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचा अनुभव असलेले महाराष्ट्राचे युवा खेळाडू यंदा किताबाचे प्रभावी दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सोनेरी यशाची आपली परंपरा कायम ठेवण्याची संधी आहे.
तज्ज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बालेवाडी मध्ये महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी कसून सराव केला आहे. त्यामुळे किताबावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निश्चयाने दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली आहे.
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघामध्ये यंदा सहभागी असलेल्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचा प्रचंड अनुभव आहे. याच अनुभवाच्या बळावर खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा गाजवण्याचा खेळाडूंनी निर्धार केला आहे. त्यामुळे यंदाही महाराष्ट्राला आपला दबदबा कायम ठेवता येणार आहे. नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. यात सोनेरी यशाच्या कामगिरीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे संघ उत्सुक आहेत.
महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो खो संघांनी खास विमान वारीतून मध्य प्रदेशमधील जबलपूरची नगरी गाठली आहे. विमानाने दोन्ही संघातील ३० खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) यांच्यासह २९ जणांचे जबलपूरमध्ये आगमन झाले.