कोविड १९ साथीनंतरच्या काळात थायरॉइड आय डिसीजच्या प्रचलनमध्ये चिंताजनक वाढ – डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ग्रुप

मुंबई : थायरॉइड आय डिसीज (टीईडी) या जटील कक्षीय दाह असलेला विकार असून त्यामुळे दृष्टी जाण्याचा धोका असतो. गेल्या दोन वर्षांत टीईडीचे प्रमाण वाढले आहे, कारण कोविड १९ साथीमुळे अनेक रुग्णांमध्ये या विकाराचे निदान वेळेत झाले नाही आणि उपचारांना विलंब झाला. शिवाय जागरुकतेचा खरोखरच अभाव असल्यामुळे अनेक रुग्णांना टीईडीची लक्षणे आणि त्यातील गुंतागुंती लक्षातच आल्या नाही. गेल्या दोन वर्षांत डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल ग्रुपमध्ये येणाऱ्या टीईडी रुग्णांच्या संख्येत २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.

‘रुग्णांच्या संख्येतील वाढ ही प्रामुख्याने कोविड साथीमुळे झाली आहे, कारण या काळात बऱ्याच रुग्णांमधील थायरॉइड विकाराच्या निदान आणि उपचारांना विलंब झाला. त्यामुळे थायरॉइडच्या पातळींमध्ये अनियंत्रित वाढ झाली. त्यात कोविड साथीमुळे तीव्र स्वरूपाचा मानसिक तणाव निर्माण झाला होता. त्याचा शरीरातील थायरॉइड पातळीवर मारक परिणाम होतो. त्यामुळे रुग्णांमधील थायरॉइडचे आजार अधिक वाढले. कोविड १९विषाणूमुळेही थायरॉइड ग्रंथींच्या कार्यात बिघाड झालेला असू शकतो, असे अलीकडेच झालेल्या अभ्यासांतून निदर्शनाला आले आहे. कोविड १९ विषाणू थायरॉइड ग्रंथींच्या कार्यावर ताबा मिळवून रोगप्रतिकार यंत्रणेला गती देऊ शकते. शिवाय विषाणूविरोधी औषधांचा ग्रंथींच्या कार्यावर परिणाम झाला असावा अशीही शक्यता आहे,’ असे चेंबूरमधील अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. नीता शहा यांनी सांगितले.

थायरॉइड आय डिसीज (टीईडी) प्रामुख्याने अनियंत्रित थायरॉइड पातळीमुळे होतो. हायपरथायरॉइडीझमच्या रुग्णांना हा विकार होण्याची शक्यता अधिक असते. टीईडी ही अनाकलनीय (इडिओपॅथिक) ऑटो इम्युन अवस्था असते आणि याचा रुग्णाच्या दृष्टीवर कायमस्वरूपी परिणाम होऊन त्याला अंधत्व येऊ शकते. टीईडीमुळे बुबुळाच्या आजूबाजूच्या भागातील स्नायू, मेद आणि सांधणाऱ्या उतींमध्ये दाह निर्माण होतो. बुबुळांच्या मागील उती तसेच डोळ्याच्या आजूबाजूच्या उती सुजतात आणि डोळा फुगीर दिसू लागतो. काही रुग्णांमध्ये डोळे लाल होणे, दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे अशी लक्षणेही दिसतात. बहुतेक रुग्णांमध्ये डोळे पूर्ण मिटले जात नाहीत, बुबुळं पुढे येतात, दृष्टी अंधुक होते, काही रुग्णांमध्ये दुहेरी दृष्टीचे लक्षण आढळते, काहींमध्ये तिरळेपणा आणि लिड लॅग (पापण्यांची असामान्य अवस्था) अशी लक्षणे आढळतात. थायरॉइड विकार नियंत्रणाबाहेर गेलेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने थायरॉइड नेत्र विकार आढळतो. पुरुष, ज्येष्ठ नागरिक, मधुमेही आणि धूम्रपान करणाऱ्यांना याचा धोका सर्वाधिक असतो. आनुवंशिकता, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणे, प्रदूषण आणि तणाव हे घटक टीईडीसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात.

कोविड साथीमुळे नियमित चाचण्या करण्याच्या रुग्णांच्या क्षमतेवर तसेच हालचालींवर बंधने आली. याचा परिणाम टीईडीवरील उपचारांना विलंब होण्यात झाला. आपल्याला टीईडी झाला आहे हेही अनेक रुग्णांना जागरुकतेच्या अभावामुळे कळले नाही.टीईडीमध्ये दिसण्यात (कॉस्मेटिक) तसेच दृष्टीमध्ये तीव्र स्वरूपाचा दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा आजार आणि त्यावरील उपचार यांबाबतची सामान्य जागरूरता वाढवण्याची आवश्यकता आहे.ज्यांना आधीपासूनच थायरॉइड विकार आहे त्यांनी नियमितपणे जनरल फिजिशिअन किंवा एण्डोक्राइन स्पेशॅलिस्टला दाखवले पाहिजे आणि थायरॉइडची पातळी नियंत्रणात ठेवली पाहिजे. याशिवाय रुग्णांनी थायरॉइड पातळी तपासत राहण्यासाठी नियमित चाचण्या करत राहिल्या पाहिजेत. टीईडीमुळे दृष्टीसंदर्भातील जटीलता निर्माण झाल्यास, त्याच्या तीव्रतेनुसार नेत्रविकारतज्ज्ञ किंवा ओक्युलोप्लास्टी सर्जन यांच्याकडून उपचार घेतले पाहिजेत.