मुंबई : मुंबईतील भाड्याच्या जागांची मागणी (शोध)वर्ष २०२२ मधील चौथ्या तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत १३. ९ टक्क्यांनी कमी झाली, तर जागांची उपलब्धता (लिस्टिंग) ३ टक्क्यांनी वाढली, असे मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने ऑक्टोबर-डिसेंबर २०२२ या काळात केलेल्या अहवालातून पुढे आले आहे. रोचक बाब म्हणजे सरासरी भाडेही मागील तिमाहीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी वाढले आहे. रोजगाराची केंद्रे आणि सामाजिक संरचनेशी सान्निध्य असल्यामुळे मुंबईतील अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व येथील सर्वाधिक पसंती असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुंबईतील सुमारे ४५% भाडेकरू २ बी.एच.के. घरांच्या शोधात आहेत, यावरून छोट्या घरांना अधिक पसंती दिली जात असल्याचे दिसत आहे. छोट्या आकारमानाच्या जागांची (५००-१,००० चौरस फूट) मागणी आणि पुरवठा सर्वोच्च म्हणजे अनुक्रमे ५२% आणि ४२% आढळली आहे.
मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै यांनी सांगितले, ‘२०२२ सालच्या पहिल्या दोन तिमाहींमध्ये भारतातील भाड्याने दिल्या जाणाऱ्या घरांची बाजारपेठ स्थिरपणे पूर्वपदावर येत होती. या काळात भाड्याच्या घरांची मागणी शिखरावर पोहोचली होती. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर भाड्याच्या घरांची मागणी पुन्हा वाढणे अपेक्षितच होते. त्यात गृहकर्जावरील वाढते व्याजदर आणि आर्थिक अनिश्चिततता यांमुळे संभाव्य गृह खरेदी करणाऱ्यांना घर खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलून भाड्याच्या घरांना पसंती देण्यास प्रोत्साहन मिळाले असावे.’