बेळगांव : ‘बालनाट्य करण्यासाठी, कार्यशाळा घेण्यासाठी एक छोटेखानी थिएटर आवश्यक आहे, त्याचं भाडं सवलतीच्या दरात असावे, तालमीसाठी छोटा हॉल पाहिजे, जाहिरातीमध्ये सवलत मिळायला हवी. व्यावसायिक नाटक मंडळींनी बालरंगभूमी चळवळीला हातभार लावायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे बालनाट्य लेखक निर्माण व्हायला पाहिजे, त्यासाठी वेळोवेळी चर्चा व्हायला पाहिजे, नवीन विषयांची पडताळणी व्हायला पाहिजे, विचार मंथनातून खूप काही निर्माण होऊ शकतं! सांस्कृतिक खात्याने व्यावसायिक नाटक कंपन्यांना वर्षातून एक तरी बालनाट्य निर्मिती करण्याची अट घातली पाहिजे,’असे स्पष्ट मत बालनाट्य संमेलन अध्यक्ष मीना नाईक यांनी व्यक्त केले. पुढे त्या म्हणाल्या, बालनाट्याला चांगल्या नाट्यगृहात चांगल्या तारखा, वेळ मिळणे आवश्यक आहे, परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्रायोरिटीने स्थान देतात, आपल्याकडची ही उदासीनता कधी नष्ट होणार? उघड्या डोळ्यांनी बालनाट्याकडे कधी बघणार? मुंबई सारख्या ठिकाणी बालनाट्यासाठी एकही छोटेखानी परवडण्यासारखं भाडं असणार नाट्यगृह नाही; आहे ती सभागृह लग्नाला दिली जातात कारण जास्त भाडं मिळतं! तर अशा बालरंगभूमीच्या चळवळीला चालना देण्यासाठी वीणा लोकूर यांनी हे बालनाट्य संमेलन आयोजित केले त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन!
बालरंगभूमी अभियान, मुंबई, ‘फुलोरा नाट्य संस्था’, अखिल भारतीय नाट्य परिषद,बेळगांव शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य संमेलनाची सुरुवात झाली. संमेलनाचे उद्घघाटन लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलन अध्यक्षा मीनाताई नाईक, बालरंगभूमी अभियान,मुंबई, ‘फुलोरा नाट्य संस्थेच्या अध्यक्षा वीणा लोकूर, अखिल भारतीय नाट्य परिषद बेळगांव अध्यक्षा संध्याताई देशपांडे, डॉ.राजेंद्र चव्हाण, देवदत्त पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
संध्याताई देशपांडे यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये. बेळगांव मधील नाट्य परंपरेची माहिती दिली. वीणाताई लोकूर यांनी मागील दोन बाल नाट्य संमेलनाचे अनुभव सांगून बेळगांव येथील बालनाट्य संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. उद्धघाटनानंतर पत्रकार सौमित्र पोटे आणि पत्रकार नरेंद्र कोठेकर यांनी ‘होईन का मी कलाकार’ या कार्यक्रमात मुक्तपणे संवाद साधला. याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमानंतर ‘मूषकनगरी’ आणि ‘जादूची बासरी’व ‘अविस्मरणी’ ही दोन बालनाट्ये सादर करण्यात आली.
संमेलनाची सुरुवात संत मीरा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या नाट्य दिंडीने झाली. डॉ.राजेंद्र चव्हाण यांनी कार्यक्रमाची सांगता केली.