स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत क्रांतिकारक, संघटक,वक्ता, लेखक, कवी, समाजसुधारक असे अष्टपैलू गुण भरपूर उजेडात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे अर्थशास्त्रावर प्रभुत्व होते. म्हणून राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानाला अष्टभुजांनी सामर्थ्यशाली बनवण्यासाठी ‘सावरकरांची अर्थनीती’ १००% योग्य होती. एखाद्या व्यक्तीच्या ठायी वैविध्यपूर्ण अलौकिक गुण असले की त्या गुणांचा परामर्श घेतला जातोच असे नाही. पण ‘अर्थकारण’ हे शेवटी सर्व समाजाचा-राष्ट्राचा मूलाधार असतं. तेव्हा त्या मूलाधार असलेल्या ‘अर्थकारणाविषयी सावरकरांनी काही विचार केला होता का ?’ या प्रश्नाचे उत्तर ठामपणे ‘होय’ असे आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचे अतिशय मूलगामी चिंतन करून काही स्वतंत्र आणि मौलिक विचार त्यांनी सूत्ररूपाने पुढे ठेवले.
जपानमध्ये मंदी आली, तेव्हा सरकारने त्यांच्या परकीय गंगाजळीतून ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी १६४ डॉलर म्हणजे १०,००० येन (त्यावेळच्या एक्सचेंज रेटने) फुकट उचलून दिले, ‘कशावरही खर्च करा.’ बाजारात वस्तूंना मागणी वाढून बसलेले उद्योग उभे राहावेत, हा त्यामागचा हेतू. पण तो पूर्णत: विफल झाला. तात्पर्य हे की व्यक्तिगत खर्चाला (पर्सनल कनझमशन) महत्व आहे. ‘पर्सनल एक्सपेंडीचर हॅज अॅन इंपोरटंट रोल, इन फॅक्ट इट इज द मेन इंजिन ऑफ ग्रोथ इज इकोनॉमि’ म्हणून परदेशात कन्झुमर स्पेडींगवरून ठरवलं जातं कि अर्थव्यवस्था नीट चालणार आहे किंवा नाही. तर तो विचार स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याकाळात मांडला हे फार महत्वाचं आहे.
यंत्र आले की बेकारी वाढते, हा नेहमीचाच युक्तीवाद असतो. बेकारी यंत्रामुळे वाढत नाही, तर संपत्तीच्या विषम वाटणीमुळे वाढते. हा वाटणीचा दोष यंत्राचा नसून तो समाजरचनेचा आहे. आज यंत्राचे सामर्थ्य आपण ओळखतो. म्हणूनच तंत्रज्ञानाला आपण महत्व देतो. तंत्रज्ञानात देशाने प्रगती केली पाहिजे, नवनव्या यंत्रांचे स्वागत केले पाहिजे. ह्या सगळ्यांचे श्रेय त्यावेळेला सावरकरांनी जी ठाम भूमिका घेतली, त्याचं होतं. अतिशय तर्कनिष्ठ विचार सावरकर करत असल्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की यंत्रावर आधारलेले अर्थकारण हवे. हा त्यांच्या अर्थकारणाचा विचाराच्या दृष्टीने पहिला महत्वाचा मुद्दा आहे. जो तात्कालिक विचार प्रवाहापेक्षा थोडासा वेगळा होता आणि तो त्यांनी ठामपणे मांडला.
दुसरा जो एक महत्वाचा विचार आहे तो असा कि, भांडवल आणि श्रम ह्या दोहोंचे हितसंबंध सर्व राष्ट्राच्या आवश्यकतेला दुय्यम असले पाहिजेत, म्हणजे इथे राष्ट्रहित हे प्रधान मानले पाहिजे. पुढचा जो विचार आहे तो तर इतका क्रांतिकारक आहे, कोणी त्याकडे त्यादृष्टीने बघत नाही. कारण अर्थशास्त्रीय निरक्षरता. “एखादा उद्योग जर भरभराटीत असेल, तर त्याच्या लाभाचा मोठा वाटा श्रमिकांना मिळेल, परंतू जर उद्योग तोट्यात असेल तर भांडवलदारालाच नव्हे तर कामगारांनाही अल्पलाभावर संतुष्ट रहावे लागेल. हेतू हा कि भांडवलदाराच्या किंवा कामगारांच्या स्वार्थी वर्गहितामुळे राष्ट्राच्या उद्योगधंद्यांना हानी पोचू नये. राष्ट्र आपल्या उद्योगधंद्यातून आणि उत्पादनातून विकास करू शकेल आणि स्वयंपूर्ण होईल, यादृष्टीने भांडवल आणि श्रम ह्या हितसंबंधांचा वेळोवेळी समन्वय करता येईल.” स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा वर्गसमन्वयाचा विचार कालातीत ठरला बघा… जर्मनीतील बी.एम.डब्ल्यू. या अलिशान मोटार गाड्या बनवणाऱ्या आस्थापनाने आपल्या कामगारांशी करार केला की, ‘ नफा झाल्यास त्यातील वाटा कामगारांना मिळेल; पण तोटा झाल्यास त्यांना वेतन कपात स्वीकारावी लागेल.’ गंमत म्हणजे हे सूत्र स्वीकारल्याने; त्याआधी तोट्यात गेलेली बी.एम.डब्ल्यू. ही कंपनी आज नफा घेऊ लागली. अन् हेच सूत्र जर्मनीतील प्रख्यात ‘व्होक्सवॅगन’ आस्थापनाने स्विकारले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘शेतकरी आणि कामगार हे राष्ट्राच्या सामर्थ्याचा आधार असल्यामुळे एकूण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तरीही हे लक्षात ठेवले पाहिजे की कामगार आणि शेतकरी हे सर्वसामान्य राष्ट्राचेच अंग असल्यामुळे त्यांनी आपल्या कर्तव्याचा आणि उत्तरदायित्वाचा वाटा उचलला पाहिजे. राष्ट्रीय उद्योगधंदे, उत्पादन, संपत्ती यांच्या विकासाशी आणि सुरक्षिततेची सुसंगत अशाच रितीने त्यांना त्यांचा वाटा मिळेल.’ किती स्वच्छ विचार आहे बघा ! शेतीच्या बाबतीतही सावरकरांना त्या काळात वस्तुस्थितीची फार मोठी कल्पना होती. संप आणि टाळेबंदीच्या बाबतीत ‘नॅशनल ट्रायब्यूनल’ची कल्पना सावरकरांनी मांडली. त्यामुळे विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (स्पेशल इकॉनॉमिक झोन/सेझ) आर्थिक विकासाचा प्रचंड वेग साधला गेला आणि तो सावरकर अर्थनीतीमुळेच. ‘राष्ट्रीयीकरण’ बाबत आज जी परिभाषा वापरली जाते ती १९३९ ला बोलण्याची दृष्टी सावरकरांकडे होती. ‘राष्ट्रीय सरकारला परवडत असेल आणि खाजगी उद्योगांपेक्षा ते अधिक कार्यक्षमतेने चालू शकत असेल, तर काही महत्वाच्या उद्योगांचे आणि उत्पादनांचे राष्ट्रीयिकरण करता येईल, परंतू व्यक्तिगत संपत्ती सर्वसाधारणपणे अबाधित मानावयास पाहिजे. कोणत्याही परिस्थिती योग्य मोबदला दिल्याखेरीज सरकार अशा संपत्तीचा अपहार करणार नाही.’ म्हणजे राष्ट्रीयिकरणासाठी सैध्दांतिक निकष नसून तर व्यवहारीक न्यायाचा निकष सावरकरांनी लावलाय.
‘स्वदेशी’चे सावरकर द्रष्टे होते. ‘अनेक उद्योगधंदे असे आहेत कि ते करून परदेशात जाऊन आमच्या तरुणांना स्वावलंबी बनता येईल. व्यापाराच्या सहाय्याने इंग्लंडमधील १ दमडी जरी आपल्या तरुणाने स्वदेशी आणली तरी ती मला एल लक्ष रुपयांची वाटते.’ म्हणजे निर्यात करा आणि परदेशातला पैसा देशात आणा, असे सावरकर सांगतात. जागतिक व्यापाराचे अभिसरण हे चालू राहिले पाहिजे. म्हणजे किती विचारांची पारदर्शकता आणि काळानुरूप बदलण्याची तयारी या साऱ्यातून वि.दा.सावरकरांची स्पष्ट होते. सावरकर सांगतात, पाश्चात्यांची शिस्त बाणवा ! पाश्चात्यांच्या कंपन्या चालताना जी शिस्त आणि व्यवस्था आढळते. ती आपल्या लोकांनी उचलली पाहिजे. ‘प्रोफेशनल मॅनेजमेंट’ हे पाश्चात्य आस्थापनांचे बलस्थान आहे. आजच्या स्पर्धेत आपण जगात उतरू शकतो. याचे कारण अनेक उद्योगांनी आफ्टर लिबरलायझेशन परिस्थितीच्या रेट्यामुळे का होईना दे हॅव अॅडोपटेड अ प्रोफेशनल अॅप्रोच आणि हा प्रोफेशनल अॅप्रोच १९३६ ला सावरकरांनी मांडला. हा किती भविष्यदर्शी विचार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
एकूण पाहता आपल्याला असे म्हणता येईल, कि त्या काळातले जे एकूण स्थूल विचार होते, त्यापेक्षा बऱ्याच अंशाने वेगळा, काही प्रमाणात त्यांचा समन्वय साधणारा, अतिशय आधुनिक आणि व्यवहारी अशी ‘अर्थनीती’ सावरकरांनी मांडली. ही नीती त्या काळात मांडायला फार मोठे धैर्य लागले असणार यात शंकाच नाही. ते धैर्य प्रशंसनीय आहे. अर्थशास्त्राबद्दल प्रगल्भ ज्ञान, काळानुरूप बदल आणि आस्था सावरकरांकडे भरपूर होती. त्यावर त्यांनी मुलगामी चिंतन केलेले होते. या चिंतनाचा विस्तार करायला त्यांना वेळ मिळाला नाही. उशिरा का होईना सुरुवातीला जगाने आणि नंतर हिंदुस्थानला त्याची जाणीव झाली. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्थानीतीचे सद् भाग्य ! जागतिकीकरणाला ‘मानवी रूप’ देण्यासाठी अर्थकारणाची चळवळ आपण उभी केली, तरच ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या अर्थक्रांती’चे ज्ञान सत्कारणी लागल्यासारखे होईल.
– विनित शंकर मासावकर