मुंबई: सांताक्रूझ येथे मुंबई विद्यापीठात ‘१३वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सव’ ११ ते १८ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ‘अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस्’ विभागाचा वसंत राष्ट्रीय नाट्य महोत्सव कोविड महामारीनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात ‘मराठी भाषा भवन’ या नाट्यगृहात दिनांक ११ मार्च २०२३ ला सायंकाळी ६:३० वाजता ‘१३वा राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवा’चे उद्घघाटन सुप्रसिद्ध नाटककार-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभाच्या अध्यक्षपदी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.डी.टी. शिर्के, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपुर आणि दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या नाट्यमहोत्सवामध्ये भारतातील विविध नामांकित संस्था सहभागी होणार असून मुंबई, नाशिक, अहमदनगरसह विशेषतः झारखंड, नैनिताल, गुजरात, गोवा या राज्यांतल्या नाट्यसंस्थांचे प्रयोग सादर होणार आहेत. १३ व्या ‘राष्ट्रीय वसंत नाट्योत्सवा’चं आयोजन मुंबई विद्यापीठाच्या ‘अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस्’चे संचालक योगेश सोमण आणि महोत्सवाचे प्रमुख प्रा.डॉ. मंगेश बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या विनामूल्य नाट्योत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असं आवाहन योगेश सोमण यांनी केलं आहे.
११ ते १८ मार्च २०२३ दरम्यान नाट्योत्सवात ’तो राजहंस एक’, ‘३ मेन’ हे गुजराती-हिंदी नाटक, ’सेम सेम बट डीफरंट’ हे हिंदी-मराठी-इंग्रजी नाटक, राशोमान’, ’दास्तान-ए-रामजी’, ‘सावरबेट’,’स्त्री, जातं, ओवी आणि कविता’,’पगला घोडा,’खटारा’,’लहरों के राजहंस’ हे हिंदी नाटक, ‘आमचं तुमचं नाटक’ नाट्याविष्कार पाहायला मिळणार आहे. जागतिक स्तरावर दिसणाऱ्या कौटुंबिक अडचणी आणि घटना दर्शवणारा, प्रेक्षकांच्या मनावर भावनिक ठसा उमटवणारा नाट्याविष्कार – ‘ आधेअधुर’ या नाटकानं ‘वसंत नाट्योत्सवा’चा समारोप होणार आहे. शनिवार सायंकाळी ७:३० वाजता या हिंदी नाटकाचं सादरीकरण होईल. त्याआधी सायंकाळी ६:३० वाजता ‘वसंत नाट्योत्सव’ या कलामैफिलीचा सांगता समारंभ सुप्रसिद्ध दिग्दर्शक कुमार सोहोनी आणि नाटककार अभिराम भडकमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.