मुंबई : मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पर्यावरण आणि जीवनशैली या विषयावर उच्चस्तरीय विचारमंथन होणार आहे. सी २० द्वारे (सिव्हिल २०) स्थापन केलेल्या १५ भिन्न गटांचा एक भाग म्हणून जगभरातील तज्ज्ञांची मते कल्पना आणि निराकरणे एकत्र आणण्याच्या उद्देशाने जी २० चा प्रतिबद्धता गट कार्यरत आहे. पर्यावरण आणि जीवनशैली या गटाची राष्ट्रीय स्तरावरील परिषद ३ आणि ४ जून २०२३ ला भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे होणार आहे.
भारताचे जी २० अध्यक्षपद जगाला त्याची परंपरा, तत्त्वे आणि कृतींबद्दल माहिती करून देण्याची संधी देते सी २० द्वारे (सिव्हिल २०) हा जी २० एंगेजमेंट ग्रुप आहे. ज्याचा उद्देश जगभरातील सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांची मते कल्पना आणि उपाय एकत्र आणणे आहे. ही जीवन (LIFE) परिषद अन्न, तळागाळातील नवकल्पना, भारतीय जीवनपद्धती, शिक्षण, निवासस्थान, फॅशन, निसर्गावर आधारित उपाय आणि कचरा या विषयांवर लक्ष केंद्रित करेल. या परिषदेत पूर्वीचे आभासी कार्यक्रम, सेमिनार, वेबिनार आणि चर्चांद्वारे जगभरातील भागधारकांसह विचारमंथन सत्रांचा समावेश असेल.
सी २० जीवनची ( C20 LlFE) ३ आणि ४ जून २०२३ ला एक महत्त्वपूर्ण परिषद होणार आहे, जी सिव्हिल २० साठी पॉलिसी ब्रीफ तयार करेल. या परिषदेला सार्वजनिक धोरणातील तज्ज्ञ, सामाजिक संस्थांचे सदस्य, शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ सर्व उपस्थित असतील. सी २० कार्यगटाचे अखिल भारतीय संयोजक डॉ. गजानन डांगे म्हणाले, ‘या कार्यगटाच्या अंतर्गत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व भागधारकांनी परिषदेला उपस्थित राहावे अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला आशा आहे की सर्व भागधारक ‘पर्यावरणपूरक जीवनपद्धती’साठी सूचना देतील. या परिषदेत पर्यावरण धोरणावर अधिक चर्चा केली जाईल आणि अंतिम धोरण मसुदा तयार करण्यात मदत होईल.’
‘महाराष्ट्र आणि गोव्यात, कचरा व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी चौपाल आणि समाजशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विकासावरील परिणाम तसेच आकांक्षांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले होते. ‘लाइफ द नंदुरबार वे’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तयार करण्यात आलेला विकास आराखडा देखील धोरण दस्तऐवजीकरणासाठी योगदान देईल,’असेही सी २० कार्यगटाचे अखिल भारतीय संयोजक डॉ. गजानन डांगे यांनी सांगितले.
भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या निसर्गरम्य प्रांगणात ही परिषद होणार आहे. प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी म्हणाले, सी २० चे सचिवालय या नात्याने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला जगभरातील सर्व प्रतिनिधींचे आमच्या संकुलात स्वागत करताना आनंद होत आहे. सर्व व्यवस्था सुरू आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही परिषद उत्तमरीत्या संपन्न होईल. ही परिषद धोरणकर्त्यांना जीवनशैली आणि पर्यावरणाशी संबंधित सर्वसमावेशक धोरणे तयार करण्यात मार्गदर्शन करेल. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने मी परिषदेत येणाऱ्या सर्व अपेक्षित प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत करतो.’ संमेलनाच्या शेवटी संमेलनात मंथन झालेल्या सर्व मुद्यांचा एकत्रित मसुदा करून जी २० परिषदेला सुपूर्द केला जाईल.