पंचमहाभूते फाउंडेशनद्वारे जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरणासाठी योगदान देण्याचे आवाहन !

जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आपण या निसर्गाचा एक लहानसा भाग आहोत हेच मानव विसरुन गेला आहे. आपण या पृथ्वीचे स्वामी आहोत, या गैरसमजात मानव बेधुंद जगत आहे. ५ जून २०२३ ला “जागतिक पर्यावरण दिन” आहे. दोन्ही हातांनी मानवाला भरभरुन देणार्‍या नि:स्वार्थी निसर्गाचे आपणही देणे लागतो, याची जाणीव करुन देण्यासाठी यापेक्षा योग्य वेळ ती दुसरी कोणती?

“पंचमहाभूते फाउंडेशन” ही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) या संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासोबतच “प्लॅस्टिक कलेक्शन ड्राइव्ह”, “बीच क्लीनअप”, “सीड कलेक्शन ड्राइव्ह”, “नो बाथ डे“, “टू मिनिटस शॉवर“, “गिफ्ट अ ट्री” आणि “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” यासारख्या अभिनव कल्पना सातत्याने राबवत आहे. “पर्यावरण विघ्नहर्ता – पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धा” या राज्यस्तरीय स्पर्धेला घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन्ही गटात उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

“सोल्युशन्स फॉर पॉल्युशन” हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते फाउंडेशन विशेष प्रयत्नशील आहे. विशेष म्हणजे या कार्याची जगभरातून दखल घेण्यात येत आहे. “वर्ल्ड एन्वायर्मेंट डे २०२३” समितीने या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिन उपक्रमांमध्ये पंचमहाभूते फाउंडेशनच्या “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” या उपक्रमाचा समावेश केलेला आहे. जागतिक स्तरावर मिळालेली ही कौतुकाची पावती पंचमहाभूतेच्या कार्याला अधिक उभारी देईल यात शंकाच नाही.

“से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” या उपक्रमाला “युनायटेड नेशन्स एन्वायर्मेंट प्रोग्रॅम” या जागतिक स्तरावरील प्रख्यात संस्थेसोबतच COP26 यांनीही पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह समाजातील अनेक आयएस अधिकारी, डॉक्टर्स आणि वकील अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांनी स्टील, काच, लाकूड, माती आणि तांब्याच्या बाटलीसोबत आपला फोटो काढून या उपक्रमाला पाठिंबा देणारे संदेश सोशल मीडियावर प्रसारित केलेले आहेत. सर्वसामान्य जनतेने या मोहिमेत मोठ्या संख्येने सामील होऊन पर्यावरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन पंचमहाभूते फाउंडेशनने केले आहे.