मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नुकतेच केले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “पर्यावरण विघ्नहर्ता – २०२३” या पर्यावरणस्नेही राज्यस्तरीय श्रीगणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच मंत्रालयात करण्यात आले. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात कलात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशभक्तांना केले.
पंचमहाभूते फाउंडेशनने ‘पर्यावरण विघ्नहर्ता – २०२३’ या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ही स्पर्धा १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पार पडेल. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून ती सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटांमध्ये संपन्न होईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक रुपात शेकडो वृक्ष देण्यात येतील. मात्र यावर्षी याच वृक्षांची लागवड करुन ‘मिनी फॉरेस्ट’ उभारण्याचा मानस आहे.
‘पंचमहाभूते फाउंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था या संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासोबतच “नो बाथ डे”, “टू मिनिट शॉवर”, “पर्यावरण विघ्नहर्ता” आणि “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” यासारख्या अभिनव कल्पना सातत्याने राबवत आहे. “सोल्युशन्स फॉर पॉल्युशन” हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते विशेष प्रयत्नशील आहे. देशातील प्रथम पर्यावरणस्नेही राज्य अशी ओळख महाराष्ट्र राज्याला लाभावी, हे पंचमहाभूते फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे, असे पंचमहाभूते फाउंडेशनचे संचालक अमित सावंत यांनी सांगितले आहे.