मुंबई: जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात ‘नवदुर्गा’ परिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शक्ती, सामर्थ्य, कर्तृत्व या विषयावर नृत्य, गायन, नाटिका, पुस्तक परीक्षण, शिक्षण विभाग आयोजित विभागीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेती प्रणाली बोडेकरचे भाषण व पीपीटीद्वारे कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला. यावेळी अमेझॉन आयोजित राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या द इनोव्हेशन स्टोरी कंपनीच्या प्रोग्राम मॅनेजर मानसी राजगोर आणि कार्यक्रम समन्वयक विशेष अतिथी प्रेक्षा राठोड व सेवानिवृत्त शिक्षिका सुनिता माने उपस्थित होत्या.
पाहुण्यांनी कौतुक करताना सांगितले, ‘नवदुर्गा कार्यक्रम पाहून आनंद झाला, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, कलागुण आणि उत्साह खरोखरच प्रेरणादायी होता.’
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ‘उत्साही महिला पालक’ सन्मान ठरला, जो वेदिका बोडरे यांना प्रदान करण्यात आला. मुख्याध्यापक व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या मेहनतीसाठी आणि प्रेरणादायी सादरीकरणासाठी अभिनंदन केले.
‘आजची स्त्रीच आहे – आधुनिक नवदुर्गा!’ या संदेशाने, बक्षीस वितरण झाले. त्यानंतर राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.