अनिर्वेध वॉकथॉन २०२६ उत्साहात संपन्न

समानता, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संदेश देत सुमारे १०० दृष्टिबाधित सहभागींचा उत्स्फूर्त सहभाग

मुंबई: अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट आणि फ्रेंड्स ऑफ आरे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनिर्वेध वॉकथॉन २०२६’चे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. दृष्टिबाधित व्यक्तींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, समान हक्कांविषयी जनजागृती करणे आणि त्यांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा या वॉकथॉनचा प्रमुख उद्देश होता.

वॉकथॉनमध्ये सुमारे १०० दृष्टिबाधित सहभागी उत्साहाने सहभागी झाले. समानता, सन्मान, स्वावलंबन आणि समावेशकतेचा संदेश देत सहभागी आणि स्वयंसेवकांनी एकत्रितपणे वॉकथॉनमध्ये सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, जोगेश्वरीचे आमदार बाळा नर आणि समाजसेविका व ट्रस्टी अंजली सरकाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी डी. पी. अग्रवाल, सचिन सरकाळे, अश्विनी बोरगावकर यांच्यासह अनेक मान्यवर, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.

दृष्टिबाधित व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात समान संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी म्हणून ट्रस्टी अंजली सरकाळे यांच्या व्यापक उद्देशाने व संकल्पनेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘समानता आणि सन्मानासाठी एक पाऊल’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या वॉकथॉनला सहभागी, स्वयंसेवक, प्रायोजक, देणगीदार, सहकारी संस्था आणि शुभचिंतकांनी दिलेल्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट आणि फ्रेंड्स ऑफ आरे यांच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *