नवी मुंबई : श्री गजानन महाराज भक्त मंडळ-वाशी आणि युथ कौन्सिल-नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ नोव्हेंबरला पनवेल मधील शांतीवन-नेरे येथे असणाऱ्या कुष्ठरोग निवारण समितीच्या केंद्रामधील रुग्णांसाठी दिवाळीनिमित्त मिठाई, फराळ, उपचारांसाठी आवश्यक चीजवस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार राजेंद्र घरत यांचे ब्रेल लिपीतील एकविसावे पुस्तक ‘एक एक करुन हात सुटताना’ आणि नवी मुंबई महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांचे ब्रेल लिपीतील नववे पुस्तक ‘कडधान्य, डाळी : पोषण मूल्यांचे समृध्द स्त्रोत’ यांचेही प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक व गजलकार ए.के.शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विचारमंचावर आर. सी. एफ. सेवानिवृत्तांच्या संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी.पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ-नेरुळचे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, कुष्ठरोग निवारण समितीचे सचिव विनायक शिंदे, पुस्तकांचे लेखक राजेंद्र घरत आणि चित्रा बाविस्कर उपस्थित होते. यावेळी बोलताना साहित्यिक ए.के. शेख यांनी आपल्या पोस्ट खात्यातील आठवणींना उजाळा दिला आणि ब्रेल लिपीप्रमाणेच पोस्टात टेलिग्रामकरिता मोर्स्ट लिपी उपयोगात आणली जायची असे सांगतानाच आपले एक गीत ‘नॅब’ या अंधांकरिता काम करणाऱ्या संस्थेचे बोधगीत म्हणून स्विकारले गेले असल्याची माहिती दिली. प्रकाशित झालेल्या ब्रेल लिपीतील दोन्ही पुस्तकांच्या लेखकांबद्दल यावेळी शेख यांनी कौतुकोद्गार काढले आणि श्रोत्यांमधून फर्माईश झाल्याप्रमाणे आपल्या काही गजला आणि गीते सुरात सादर केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयास आपण आपली विविध पुस्तकेही भेटीदाखल देत असल्याची घोषणा शेख यांनी यावेळी केली.
प्रभाकर गुमास्ते यांनी या कुष्ठरोग्यांकरिता असलेल्या आश्रमात अंध मुलांसाठी स्पर्शाने वाचण्याच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले जात आहे यातून या पुस्तकांचे लेखक व आयोजक यांचा नियतीने अन्याय केलेल्यांप्रतिचा संवेदनशील दृष्टीकोन अधोरेखित झाल्याचे आपल्या भाषणांत नमूद केले. व्ही.डी. पाटील, पुस्तकांचे लेखक राजेंद्र घरत आणि चित्रा बाविस्कर यांचीही यावेळी समयोचित भाषणे पार पडली. युथ कौन्सिलचे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी प्रास्तविक आणि सूत्रसंचालनाची बाजू नेटकेपणाने सांभाळली. श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या शिवाजी शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री आर एस नाईक, रमेश सुर्वे, अशोक महाजन, निशांत बनकर, विक्रम राम, सुरजितसिंह उभी, निशांत बनकर, दत्ताराम आंब्रे, एस.बी. सिंग, नरेश विचारे, सुनिल आचरेकर, दीपक दिघे, विकास साठे, रणजित दिक्षित, अजय माढेकर आदिंनी परिश्रम घेतले.