या कुटुंबाला ‘एकदा येऊन तर बघा’

मुंबई : आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब २४ नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतंय. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवायची असेल तर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित’एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल.

श्रावण, फाल्गुन आणि कार्तिक या तीन भावांची ही गोष्ट आहे. फुलंब्रीकर कुटुंब हॉटेल व्यवसाय सुरु तर करतात पण ग्राहक यावेत यासाठी त्यांना काय आणि किती प्रयत्न करावे लागतात? ज्या गिऱ्हाईकांची वाट बघत आहेत ते गिऱ्हाईक हॉटेल मध्ये आल्यावर हे कसे एका प्रॉब्लेम मध्ये अडकत जातात आणि मग पुढे काय होतं ? त्यातून त्यांच्यावर कोणकोणते प्रसंग ओढवतात आणि त्याला ही मंडळी कशी सामोरी जातात? याची गमतीशीर गोष्ट म्हणजे ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट.

गिरीश कुलकर्णी,तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने फुलंब्रीकर कुटुंबात पहायला मिळणार आहेत. या पाच जणांसोबत सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार आदी कलाकारांची भली मोठी फौज चित्रपटात आहे. हे कुटुंब तुम्हाला निखळ हास्याची मेजवानी देईल, असा विश्वास दिग्दर्शक प्रसाद खांडेकर व्यक्त करतात.

२४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे.