जलतरण वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत दाखल

पणजी: महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये विजयी मालिका कायम ठेवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वॉटरपोलोमधील उपांत्य फेरीकडे वाटचाल केली.

पुरुष गटात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीनंतर केरळ संघावर ६-४ अशी मात केली. महाराष्ट्र संघाकडून आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये गौरव महाजनी आणि पियुष सूर्यवंशी यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. केरळ संघाने शेवटच्या डावात दोन गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली होती. मात्र महाराष्ट्राने शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवीत सामना जिंकला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राचा पश्चिम बंगालबरोबर सामना होणार आहे.

महिला गटात महाराष्ट्राने कर्नाटक संघावर १५-७ असा दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्र संघाकडून राजश्री गुगळे आणि पूजा कुंबरे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची केरळ संघाशी गाठ पडणार आहे. दोन्ही गटांचे उपांत्य सामने शुक्रवारी होणार आहेत.