मुंबई: मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ ला‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे. चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे सुप्रसिद्ध अभिनेते असून उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी अनुभवून प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये गुंग होणार आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव यांनी केले असून कथा अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी स्वतः लिहिली आहे. दौलतराव पाटील आणि सदा जिवाभावाचे मित्र असून सदाच्या पत्नीसोबत दौलतने संबंध ठेवल्याचे सदाला कळते. तेव्हा संतप्त झालेला सदा दौलतचा बदला घेण्याच्या नादात काय काय करतो हे चित्रटातून कळणार आहे.
“प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या संग्रहातील सुवर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.