मुंबई:जुहूच्या विद्यानिधी शिक्षण संकुल येथे भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन श्रीराम उत्सव आणि शिववैभव या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मंडळाच्या प्रथेप्रमाणे प्रमूख पाहूणे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजीव बर्वे यांना सन्मानाने बॅंड आणि लेझिमच्या गजरात शाळेच्या प्रांगणात आणण्यात आले.त्यांनी प्रथम भारतमाता पूजन केले आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास यावर्षी साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिर लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनी शिवकालीन ग्रामव्यवस्था, बारा बलुतेदार पद्धती, महाराजांचे अष्टप्रधान मंडळ व त्याची कार्यप्रणाली, बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा, राजमाता जिजाबाईं यांची दूरदृष्टी या नृत्य नाटिका तसेच पोवाडा, शिवप्रताप गीते, भाषणे व प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील आदर्श प्रसंगांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. शिवाजी महाराजांचा इतिहास गड किल्ल्यांच्या संवर्धनातून आजच्या पिढीसाठी जिवंत ठेवण्याचे काम करणारे दुर्गवीर प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष संतोष हसुरकर यांना उपनगर शिक्षण मंडळाच्या वतीने २०२४ चा वारद पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
संजय बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,’विद्यानिधीतील राष्ट्रीय संस्कार पाहून आपण भारावून गेलो आहे.प्रत्येक भारतीयास आपल्या राष्ट्राप्रती प्रेमभावना असलीच पाहिजे.देशाचे खंबीर नेतृत्व देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहे.येत्या काही काळात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल,’
यावेळी विद्यानिधी शिक्षण संकुलातील विविध शाखांमधून या शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणारे कर्मचारी व सेवेची २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्या प्रथेप्रमाणे विद्यानिधी आर्किटेक्चर कॉलेज ( KRVIA)च्या विद्यार्थ्यांनी कूपर हॉस्पिटलच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यात माजी विद्यार्थी ,पालक आणि जहू परिसरातील स्थानिक नागरिकांनी रक्तदान केले. विद्यानिधी आर्किटेक्चर कॅालेजद्वारे (KRVIA) आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन संजय बर्वे यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाला उपनगर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश मेहता, कार्याध्यक्ष संजीव मंत्री ,सचिव डॉ. साधना मोढ, कोषाध्यक्ष विनायक दामले, आजीव सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनिषा डोंगरे आणि प्रशांत पाटील यांनी केले.