‘एहसास’… उर्दू कविता, गझल आणि सुफी संगीताची सुरमयी संध्याकाळ

मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनी अल्पसंख्याक विकास विभाग महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सहकार्याने, ‘एहसास या सांस्कृतिक समृद्धी आणि कलात्मक सुरमयी कार्यक्रमाचे भारताचे प्रवेशद्वार गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूच्या सान्निध्यात आयोजन करण्यात आले आहे. उर्दू मुशियारा हा कार्यक्रम गेली ११ वर्षे यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत होता. त्याचेच नवे रुप म्हणजे ‘एहसास’ हा कार्यक्रम असणार आहे. यामधून शायरी, गझल आणि सूफी असा त्रिवेणी संगम एकाच व्यासपीठावर प्रथमच पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी यांच्या वतीनं २६ जानेवारी २०२४ ला संध्याकाळी ५:३० वाजता गेटवे ऑफ इंडियाला कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

भारतीय संस्कृतीत संगीताला कायमच पवित्र मानले गेले आहे. तसेच संगीत हे मोक्षप्राप्तीचे उत्कृष्ट साधन मानले जाते. ‘एहसास’ हा कार्यक्रम केवळ सादरीकरणाचा नाही; तर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील एक भावपूर्ण सुरेल संवाद या कार्यक्रमात असणार आहे. कार्यक्रमात नामचीन कलाकारांकडून उर्दू कविता, गझल तसेच सुफी संगीताचा अविरत नजराणा तुमच्यासमोर सादर होणार आहे. अध्यात्म, प्रेम आणि समरसता ही सुफी संगीताची खासियत आहे. सुफी संगीतामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि प्रेम या घटकांचा अनोखा संगम पाहायला मिळतो, म्हणूनच सुफी संगीत कायम मनुष्याच्या मनात खोलवर रुजते. आपला भारत अमीर खुसरो, बाबा बुल्ले शाह आणि संत कबीर यांसारख्या सुफी संतांची भूमी आहे. त्यामुळे आपल्याकडे सुफी संगीताचा दर्जा कायम उच्च राहिला. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे बॉलीवूडमधे सुफी संगीताला मिळालेले मानाचे स्थान.

या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे तरुण कवींसोबत उर्दू शायरीचा आनंदाची अनुभूती घेता येणार आहे. उर्दू शायरीच्या जगातले ४ दिग्गज वसीम बरेलवी, मंझर भोपाली, सचिन पिळगावकर आणि ओबेद आझम आझमी या चौघांच्या शायरीचा आनंद श्रोत्यांना घेता येईल. त्यानंतर ख्यातनाम गायक हरिहरन आणि हर्षदीप कौर यांचा मंत्रमुग्ध आवाज ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पत्रकार इम्तियाज खलील करणार असून, त्यांच्या जोडीला अभिनेता, लेखक, स्टँड अप कॉमेडियन रेहमान खान आणि कवयत्री प्रिया मलिक असणार आहे. कार्यक्रमाला अधिक चार चांद लावण्यासाठी प्रसिद्ध साबरी ब्रदर्सच्या वंशातील शबाब साबरी देखील श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असणार आहेत.

अभिनेते सचिन पिळगावकर गेली अनेक दशकं चित्रपटसृष्टीत काम करत आहे. बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ५० वर्षांपेक्षा जास्त काळ अविरतपणे सुरू आहे. सचिन पिळगावकर हे मल्टिटॅलेंडेट व्यक्तिमत्त्व आहे हे सर्वांना माहिती आहेच.अभिनयाबरोबरच ते उत्तम गायक आहेत. तसेच त्यांना उत्तम शायरी सुद्धा येते. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कायम मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेचा प्रभाव असल्याचे दिसते. मराठीबरोबरच त्यांना उर्दू भाषा देखील उत्तम येते. त्यांचे शिक्षण संपूर्ण मराठी भाषेत झाले असले तरी, उर्दू भाषेवर त्यांची उत्तम पकड आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सचिन पिळगांवकरांची शायरी ऐकण्याचा आनंद यावेळी घेता येईल. उर्दू संस्कृती, साहित्य आणि वारसा असा एक अप्रतिम मिलाप असून विशेष बाब म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.

कला ही सर्वव्यापी- अब्दुल सत्तार, मंत्री अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभाग
कुठलीही कला धर्म, भाषा, पंथ असे सर्व भेद क्षणार्धात मिटवते. म्हणूनच कलाकार हा कायम आपल्याला अविरत आनंदाची अनुभूती देतो. एहसास हा कार्यक्रम आपल्या मनाला नक्कीच भावेल यात तिळमात्र शंका नाही, यात तिळमात्र शंका नाही.

संगीत हाच आपला आत्मा- आयए कुंदन, प्रधान सचिव, राज्य अल्पसंख्यांक विभाग
कलेची तुलना ही कशासोबतच होऊ शकत नाही. म्हणूनच संगीत हे कायम मनुष्याच्या हद्याच्या सर्वाधिक जवळ राहिलेले आहे. एहसास या कार्यक्रमातूनही आपल्याला उर्दू साहित्य संस्कृतीचा वारसा अनुभवायला मिळणार आहे.

सादरकर्ते कलाकार:

वसीम बरेलवी: कवी, प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, आपल्या शब्दांतून मानवी भावनांना अलवारपणे हात घालतात अशीच त्यांची ओळख आहे. बरेलवी मानवी भावनांचे अचूक विणकाम करण्यासाठी ओळखले जातात. म्हणूनच सामान्यांपासून ते अगदी खास माणसांपर्यंत यांचे दोहे लोकप्रिय आहेत.

अशोक चक्रधर: पद्मश्री पुरस्कार विजेते, प्रख्यात लेखक, कवी आणि दिग्दर्शक, त्यांच्या अनोख्या कवितेसाठी ओळखले जातात. अमेरिका, इंग्लंड, सोव्हिएत युनियन, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, इटली, पॅलेस्टाईन, इस्रायल, ओमान, त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांना साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमासाठी यांनी भेटी दिल्या आहेत.

ओबेद आझम आझमी: अंजुमन-ए-तरकीचे सचिव, काळजाला हात घालणारी कविता करणारे तसेच उर्दू साहित्याच्या क्षेत्रात योगदान.

सचिन पिळगावकर: एक बहु-प्रतिभावान व्यक्तिमत्व – अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता, आपल्या काव्यात्मक गुणवत्तेने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे.

हरिहरन: दशकानुदशके भारतीय संगीतातील एक दिग्गज, बॉलीवूडमधील हिट आणि गझलमधील मखमली आवाजासाठी ओळखले जाणारे.

हर्षदीप कौर: भारतीय पार्श्वगायिका जी तिच्या बॉलीवूड हिंदी, पंजाबी, इंग्रजी आणि सूफी गाण्यांसाठी ओळखली जाते. तिच्या भावपूर्ण गायनामुळे ती “सुफीची सुलताना” म्हणून प्रसिद्ध आहे.

शबाब साबरी: शबाब साबरी बॉलिवूड ख्यातनाम पार्श्वगायक. शबाब साबरी यांचे वडील इक्बाल साबरी आणि काका अफजल साबरी हे भारतातील कवाल्ली आणि सूफी गायक होते. शबाब साबरी यांनी वयाच्या १४ व्या वर्षी राशिद खान साहेबांच्या हाताखाली प्रशिक्षण सुरू केले. नंतर साबरी वडिलांसोबत शिकली आणि अनेक लाइव्ह शोमध्ये सादर केली आहे.