मुंबई:एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन विलक्षण कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव ऍड फिजच्या ‘चैत्र चाहूल’द्वारे विनोद आणि महेंद्र पवारांनी सोळा वर्षे ही समृद्ध परंपरा जपत १७ वे ‘ध्यास सन्मान’ वर्षे नुकतेच साजरे केले. जेष्ठ प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे यांना जेष्ठ भाषा अभ्यासक राजीव जोशी यांच्या हस्ते आणि लोककलावंत मनोहर गोलांबरे यांना जेष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते आणि विनायक गवांदे व डॉ. नीना सावंत यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. यापूर्वी अरुण काकडे, संजना कपूर, माधुरी पुरंदरे, कांचन सोनटक्के, अरुण होर्णेकर, चंद्रकांत काळे, प्रदीप मुळ्ये अशा अनेक मान्यवरांना ध्यास सन्मान मिळाला आहे.
“पाण्याने भरलेलं तळ पाहिल्यानंतर नैसर्गिकरित्या माणसाला जितका आनंद होतो तितकाच आनंद मला प्रेक्षकांनी भरलेलं नाट्यगृह पाहिल्यावर होतो. नाट्यगृह किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वजण जाणतोच! रामानंद शाहिरांनी आत्माराम पाटलांचं जे गीत गायलं त्यामध्ये त्यांनी मनुष्याच्या जाती म्हणजे काय? याविषयी सांगितलं. खरं तर इतका दणकट कार्यक्रम झाल्यानंतर अजूनही आपण त्या भावनांनी उद्रेक झालेल्या किंवा भावनोद्दिपीत झालेल्या अवस्थेत आहोत. मी मात्र जरा शांतच बोलणार आहे. कारण प्रायोगिक नाटक म्हणजे आधी नाटक, मग प्रायोगिक नाटक आणि त्यातला अधिक प्रायोगिक नाटक म्हणजेच ‘A minority within a minority’ म्हणजेच अल्पसंख्यांक मधला अल्पसंख्यांक असं आमचं नाटक असेल. कारण प्रायोगिक नाटक काहीतरी वेगळं असतं, ते अधिक कशाचा तरी खोल वेध घेत असतं. चैत्र चाहूल या कार्यक्रमातील ‘ध्यास सन्माना’चे मानकरी प्रख्यात प्रयोगशील नाटककार, अभिनेते निर्माते अतुल पेठे बोलत होते”. या सोहळ्यात त्यांचा प्रयोगशील रंगकर्मी म्हणून तर लोककलावंत, अभ्यासक आणि संगीतकार मनोहर गोलांबरे मनोहर गोलांबरे यांचा ‘ध्यास सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
सविस्तर बोलताना पेठे म्हणाले, “रामानंद शाहिरांनी जे गीत गायले ते इतकं महत्त्वाचं आहे, त्यांनी वर्णन केलेल्या मनुष्याच्या १०८ जाती ऐकता, एका अर्थाने ते माणसांचे केलेले १०८ भेद आहेत. म्हणजे ब्राह्मण आहे, साळी आहे, कोष्टी आहे, माळी आहे, … आलाना आहे, …फलाना आहे. पण खरी जात ही आहे की माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे, जे आत्ताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे. हेच सांगण्याचा हेतू आहे, फक्त परंपरा म्हणजे नुसतं दणादणा वाजवून आपलं भावनांनी उद्दीपित होणं नव्हे, त्या परंपरांमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो. त्याच परंपरा राहतात आणि ज्याला परंपरा माहित आहेत तोच नवतेचा वेध घेऊ शकतो. आमचं नाटक या नवतेचा शोध घेणारं आहे. “ध्यास सन्मान” ज्यांना ज्यांना मिळाले आहे त्यांनी त्यांच्या क्षेत्रात नावीन्य आणले आहे.”
लोककलावंत, अभ्यासक आणि संगीतकार मनोहर गोलांबरे यांनाही हा पुरस्कार मिळाला. त्यांनी शाहीर आत्माराम पाटील यांचे कवन गायले. त्यामुळे आपली भाषिक आणि राजकीय समृध्द परंपरा समोर आली. कार्यक्रमात सुरुवातीला जालन्याचे शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांचा ‘महाराष्ट्राची लोकगाणी’ हा लोकसंगीताचा दणकट कार्यक्रम सादर झाला. रामानंद यांची गायनातील ऊर्जा आणि त्यासोबत त्यांचा चफकल अभिनय रसिक प्रेक्षकांना मोहित करणारा होता.
या कार्यक्रमाला प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक अरुण होर्णेकर, शफाअत खान, प्रदीप मुळ्ये, निळू दामले, श्रीकांत बोजेवार उर्फ तंबी दुराई, रघुनंदन गोखले, प्रमोद पवार, मुकुंद टाकसाळे, अवधूत परळकर, रोहिणी गोविलकर, अरुण कदम, विजयदादा चव्हाण, जयप्रकाश लब्दे, श्याम शिंदे आणि अनेक रंगकर्मी यांची उपस्थिती होती.