‘गोंधळ’चे ओटीटी डील? दिग्दर्शकाने एकाच दिवशी घेतल्या ४ आलिशान गाड्या

मुंबई: चित्रपटगृहांत यशस्वी ठरलेला आणि आशयघन मांडणीमुळे प्रेक्षक–समीक्षकांची दाद मिळवलेला ‘गोंधळ’ आता मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेला का? असा प्रश्न सर्वत्र विचारला जातोय. त्यामागचं कारणही तसंच आहे!

अलीकडेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी एकाच दिवशी तब्बल चार लक्झरी गाड्या खरेदी केल्याची चर्चा रंगली. समाज माध्यमांवर छायाचित्रे आणि पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर लगेचच सर्वत्र कुजबुज सुरू झाली, “हा सगळा ओटीटी डीलचा परिणाम तर नाही ना?”

हा चित्रपट नेटफ्लिक्स, ॲमेझॅान प्राईम व्हिडिओ किंवा झी फाईव्हसारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, चार गाड्या एकाच वेळी खरेदी करण्यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही सूत्रांच्या मते हे डील कोट्यवधी रुपयांत झाले असावे. सध्या त्यांच्याकडे मेबाख ही आलिशान गाडी असून त्यांनी रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू, बीव्हायडी सीलायन या सहा करोडच्या गाड्या घेणे म्हणजे चांगलीच मोठी डील झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्याचा नेमका आकडा किती, याबाबतच्या तर्कवितर्कांना सध्या उधाण आले आहे.

दरम्यान, ‘गोंधळ’ चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. ९९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्सकडून (फिप्रेस्को) मिळालेला प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रण असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. तसेच २२व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल २०२६मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा मानाचा पुरस्कार मिळाला.

याचबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मधील इंडियन पॅनोरमा विभागात ५६ वर्षांत प्रथमच मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पिकॉक’ अवॉर्ड पटकावत ‘गोंधळ’ने राष्ट्रीय पातळीवर मोठी दखल मिळवली. नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार २०२६ मध्ये ‘गोंधळ’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कार मिळाले.

एकाच चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले हे यश मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरत असतानाच आता ‘गोंधळ’ नेमका कोणत्या ओटीटीवर आणि कधी प्रदर्शित होणार, हे पाहाणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. अधिकृत प्रदर्शनाची घोषणा होताच चित्रपट पुन्हा चर्चेत येणार, हे मात्र नक्की!