मुंबई: विद्यानिधी शैक्षणिक संकुलात माजी विद्यार्थ्यांचा नुकताच मेळावा झाला. या अवसरावर मराठी चित्रपट “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” दाखवण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांबरोबर वर्ग खोलीत बसून सुसंवाद साधत चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.
संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री यांच्या संकल्पनेतून या औपचारिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मराठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलम प्रभू व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष टक्के यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
अभिनेता मंदा मांडवकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, “विद्यानिधी मराठी माध्यमातून अविरत श्रमजीवी वस्तीतील विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे हे पाहून मला अत्यानंद झाला आहे.”
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या विद्यानिधी मराठी शाळेने आम्हाला नेहमीच घरासारखे वातावरण दिले. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्हाला आमच्या शाळेतील सुसंस्कारांची शिदोरी उपयोगी पडत आहे.”
कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर स्वर्गात आकाशगंगा या गीतावर नृत्य गायनाचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार व मनमोकळ्या गप्पांनी झाली.