उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे तर मुख्य कार्यवाहपदी सुशांत शेलार
कोल्हापूर: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले आणि उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे यांची तर मुख्य कार्यवाहपदी सुशांत शेलार यांची एकमताने निवड करण्यात आली. महामंडळाची २०२६-२०३१ कालावधीसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. महामंडळाच्या १७ जणांच्या कार्यकारिणीत सोळा संचालक समर्थ पॅनलचे आहेत.
नूतन पदाधिकारी निवडीसाठी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक आज १५ जून २०२६ ला कोल्हापुरात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके या अध्यक्षस्थानी होत्या.
खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड करण्यात आली. सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आहे. सहकार्यवाहपदी दीपक कदम व प्रवीण पाटील यांची निवड झाली.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती दिली. चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची २३ जूनला पुणे येथे पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत तीन वर्षे आणि वर्ग सभासद असलेल्या सभासदांना अ वर्गात समावेश करण्याचा निर्णय होईल. तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन, कर्मचाऱ्यांचे पेन्शन यांसंदर्भातील निर्णय घेतले जातील. पहिले मराठी चित्रपट संमेलन भरविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. त्या संदर्भातही पुणे येथील बैठकीत निर्णय होणार आहे.याशिवाय अभिनेते विक्रम गोखले यांनी जी दोन एकर जागा दिली आहे त्या ठिकाणी वृद्ध कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभारणीचा प्रस्ताव आहे. या संदर्भातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला संचालक अजित शिरोळे, राज कारजी, सुभाष नकाशे, चैत्राली डोंगरे, रविंद्र गावडे, गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी उपस्थित होते. या बैठकीला विरोधी गटाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगावकर अनुपस्थित राहिल्या.