श्रावण मास परिपाठ आणि शिक्षक दिन सोहळा संपन्न

मुंबई: जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात “चैतन्यमय श्रावण” हा भक्तिमय परिपाठ दिनांक १ सप्टेंबर २०२६ ला सकाळी ७.३० वाजता किशनचंद वलेचा सभागृहात इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रमुख पाहुणे म्हणून कुंती गाला (I.N.W. बॉम्बे एअरपोर्ट) उपस्थित होते. दीपप्रज्वलन व स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

परिपाठात श्रावण महिन्याचे महत्त्व, शिवपूजा, कीर्तन व मंगळागौर, राष्ट्रीय सणांची माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली. स्वतंत्रता दिवसांची माहिती इंग्रजीतून सादर केले.नारळी पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी, मंगळागौर, पोळा व मातृदिन यावर गीत, नृत्य व हृदयस्पर्शी नाटक सादर झाले. पारंपारिक वेशभूषा व फुलांनी सजलेल्या मंचामुळे सभागृह चैतन्यमय झाले, या परिपाठाच्या निमित्ताने संस्कृतिक भान ठेवताना माता पालक प्रतिनिधींचे मातृपूजन व उत्कृष्ट वर्ग पालक प्रतिनिधी फिरता चषक गौरव समारंभ हा कार्यक्रमाचा मानबिंदू ठरला.

शाळेतील १० वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाचा गुणविशेष ओळखून त्याचे वर्णन करणारी स्वहस्तनिर्मित भेटकार्डे तयार केली. ही आगळीवेगळी भेट शिक्षकांना देत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी घडतात, हा भाव या उपक्रमातून दिसून आला.

प्रमुख पाहुण्यांनी भारतीय संस्कृती जतन व गुरू-शिष्य परंपरेचा संदेश देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त ‘समर्पण निधी ‘ या संकल्पनेतून खाऊच्या पैशातून जमा केलेला समर्पण निधी अंधांसाठी कार्य करणाऱ्या के डी वोरा अंध महिला संस्थेला भेट देण्याचा संकल्प केला. कुटुंब प्रबोधन व समाजऋण या मूल्यांसह हा संयुक्त सोहळा “सामान्यतेकडून असामान्यतेकडे” या ध्येयाला साजेसा ठरला.