मुंबई: विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या प्राथमिक व बालवर्गाचा भोंडला उत्साहात साजरा झाला. विद्या विकास मंडळाच्या प्रांगणात दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ ला पारंपरिक भोंडला आयोजित करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील लोकपरंपरांचे जतन व्हावे आणि बालवयापासूनच आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख मुलांना व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिशुकुल प्राथमिक विभागातील मुलींनी, निमंत्रितांनी व स्त्री पालकांनी भोंडल्याच्या पारंपरिक गीतांच्या तालावर फेर धरून आनंद घेतला.
भोंडल्याला माजी विद्यार्थिनी हेमांगी देसाई,माया सावंत, मीनल शेठ, मिनाक्षी जामसंडेकर, वेदिका सकपाळ व मुग्धा मोरे आवर्जून उपस्थित होत्या. पारंपरिक सण, उत्सव आणि लोककला यांची ओळख भोंडल्यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांतून मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी असे उपक्रम शाळेत साजरे केले जातात. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.