मुंबई: ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र हा भारतातील पहिला उपक्रम आहे. राज्यातील झोपडपट्टी, दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांतील गरजू युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानांतर्गत (PMKUVA) कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जागेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, आता किमान ३०० ते १५०० चौरस फूट जागेतही प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे. नागपुर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि जळगाव या जिल्ह्यात १२ केंद्रांचे उद्घाटन झाले. ‘ असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास योजनेचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन मेट्रो चौक येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आवारातील दक्ष सभागृहात संपन्न झाले. या योजनेंतर्गत केवळ ३०० चौ. फुटांच्या जागेत कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात राज्यातील १०० केंद्रांना प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली. त्यापैकी १२ केंद्रांचे उद्घाटन झाले. या उपक्रमाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण गावागावांत आणि वस्तीवस्तीपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र हा भारतातील पहिला उपक्रम आहे. राज्यातील झोपडपट्टी, दुर्गम, डोंगराळ, नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांतील गरजू युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत (PMKUVA) कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी जागेच्या निकषांमध्ये शिथिलता देण्यात आली असून, आता किमान ३०० ते १५०० चौरस फूट जागेतही प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार आहे. नागपुर, डहाणू-पालघर, नंदुरबार, यवतमाळ, पुणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि जळगाव या जिल्ह्यात १२ केंद्रांचे उद्घाटन झाले.
दरम्यान, २०२६ हे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याचे औचित्य साधून, या अभियानांतर्गत स्थापन होणाऱ्या सर्व कौशल्य विकास केंद्रांना ‘महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ असे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त त्यांच्या गावी या उपक्रमाची घोषणा केली. महात्मा फुले यांच्या व्यावसायिक शिक्षणाच्या विचारांना अनुसरून युवकांना आधुनिक बाजारपेठेच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे, असेही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी कौशल्य प्रशिक्षण केंद्रांसाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. मात्र, आता किमान ३०० चौ. फुटांच्या जागेत प्रशिक्षण केंद्र सुरू करता येणार असल्याने स्थानिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उपलब्ध स्थानिक पायाभूत सुविधांचा प्रभावी उपयोग करून कौशल्य प्रशिक्षणाचा विस्तार करणे शक्य होणार आहे. विशेषतः झोपडपट्ट्या, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रे, दुर्गम आणि डोंगराळ भाग, नक्षलग्रस्त क्षेत्रे, आदिवासी भाग तसेच ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. गावठाण, आकांक्षित जिल्हे आणि तालुक्यांपर्यंत प्रशिक्षण सुविधा पोहोचवून सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना रोजगारक्षम बनविण्याचा शासनाचा मानस आहे.
या केंद्रांमध्ये उद्योगांच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणपत्र आणि रोजगार यांची परिणामकारक सांगड घालण्यावर भर देण्यात येणार असून, प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असेही मंगलप्रभात लोढा म्हणाले.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ. अमित सैनी, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
“उद्योगासाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर”
नामांकित सामाजिक, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक संस्था, उद्योग आणि शासन यांच्या समन्वयातून स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे.
• कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर युवा घडविणे
ग्रामीण आणि शहरी भागातील कौशल्य प्रशिक्षणाच्या उपलब्धतेतील तफावत कमी करणे, आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून युवकांना आत्मनिर्भर बनविणे, हा या योजनेचा व्यापक दृष्टिकोन आहे. केवळ प्रशिक्षण केंद्रे सुरू करणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, कौशल्यसंपन्न, रोजगारक्षम आणि आत्मनिर्भर युवा महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.