कागल:काेल्हापूरमधील कागलच्या श्री लक्ष्मी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज हसुरच्या पटागंणात मस्ती करता करता यशाेशिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकीसाठीची धडपड लक्षवेधी ठरली. दहावी २००२ आणि बारावी २००४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची दाेन दशकांनंतर पुन्हा एकदा शाळा भरली. या २२ वर्षांच्या मैत्रीच्या विरहानंतरची ही भेट काैतुकास्पद कार्याने सत्कर्मी लागली.या दाेन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे पुढाकार घेत हसुरच्या माळरानावर फुलत असलेल्या ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण केले. यातून त्या सर्वांना अनोख्या पध्दतीने स्नेह मेळावा (गेट टू गेदर) साजरा करता आला.
खडकाळात या दाेन्ही बॅचच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीचे रानमाळ फुलवले आहे. त्या ओसाड आणि खडकाळ जागेवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणे निश्चितच अभिनंदनीय आणि अभिमानाची गोष्ट आहे. सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी जवळजवळ २२ वर्षांनी एकमेकांना भेटले. कोण कुठे काय करतो, याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता होती. सगळ्यांची इच्छा पुन्हा एकदा मागे वळून आपल्या कुटुंबासाठी, शाळेसाठी, गावासाठी आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करावे अशीच होती.अशा अनोख्या गेट टू गेदरचे कौतुक परीसरातील पर्यावरण प्रेमी करत आहेत.