दृष्टी नसली तरी या मुलामुलींचा दृष्टीकोन व्यापक’ – महेंद्र काेंडे

नवी मुंबई:‘स्नेह ज्योती निवासी अंंध विद्यालयातील विद्यार्थी हे अंतःचक्षूंनी ‘पाहतात’, स्पर्शाने ‘वाचतात’. ही मुले इतरांच्या केवळ आवाजाने कोण आलंय ते ओळखतात. म्हणून असे म्हणावेसे वाटते की या मुलांना दृष्टी नसली तरीही त्यांचा दृष्टीकोन व्यापक आहे’ असे उद्‌गार नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी व कवी, निवेदक महेंद्र काेंडे यांनी काढले. घराडी, मंडणगड, जि. रत्नागिरी येथील स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयात त्यांच्या हस्ते लेखक-पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ‘मासे असे नि तसे’ व ‘प्युअर मराठी’ या दोन तर नवी मुंबई महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या ‘धमाल कमाल’ या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन १७ मार्च रोजी संपन्न काेंडे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा प्रणव सेनगुप्ता ,अश्विनी घरत उपस्थित होत्या. कार्यक्रम प्रसंगी काेंडे यांचा सन्मानपत्र व दीप देऊन गौरव करण्यात आला.

राजेंद्र घरत यांनी आपले ब्रेल लिपीमधील बाविसावे व तेविसावे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यवत करताना गेल्या पंधरा वर्षात घराडीसारख्या दुर्गम भागात अशा पुस्तक प्रकाशनासाठी मुंबई, नवी मुंबई येथून विविध मान्यवरांना तेथे सोबत नेताना अतीव समाधान झाल्याचे सांगितले. घरातील वाढदिवस, विवाहांचे वाढदिवस कोणत्यातरी महागड्या हॉटेलांत वारेमाप पैसे खर्चून साजरे करण्याऐवजी तसेच दिवंगत मातापित्यांचे वर्षश्राध्द आदि प्रसंग पोट भरलेल्या लोकांनाच पुन्हा भोजन देऊन पार पाडण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये जाऊन साजरे करा, त्या मुलामुलींना आपला सहवास द्या, त्यांचा तो दिवस गोड करा असे आवाहन केले. चित्रा बाविस्कर यांनी यावेळी प्रतिभा सेनगुप्ता यांना असेच समाजसेवेचे काम करण्यासाठी व अधिकाधिक पुस्तकांना ब्रेल लिपीत रुपांतरीत करण्यासाठी ईश्वराने उर्जा पुरवावी अशी भावना व्यक्त केली. येथील दृष्टीहीन मुलामुलींनी त्यांचे संगीत शिक्षक व्याघ्रांबरे यांच्या साथीने काही सुरेल गाणीही सादर केली. यावेळी शाळेतील दृष्टीहीन मुलांना खाऊ, मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स तसेच सेविकांसाठी साड्यांचेही वाटप करण्यात आले.