अंकिता राऊत करणार ‘जीवाचं रानं’

मुंबई : वेगवेगळ्या म्युझिक अल्बममधून आणि इन्स्टा यूट्यूबवरील रीलच्या माध्यमातून अभिनेत्री अंकिता राऊत हे नाव सर्वांना परिचित आहे. आपल्या नृत्य अदाकारीने रसिकांची मने जिंकणारी अंकिता राऊत आता ‘जीवाचं रानं’ करायला सज्ज झाली आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच अंकिता कोणासाठी आणि कशासाठी ‘जीवाचं रानं’ करणार आहे? तर ‘मायबोली म्युझिक’च्या पहिल्या वाहिल्या म्युझिक अल्बमसाठी तिने ‘जीवाचं रानं’ करायचं ठरवलं आहे. मायबोली म्युझिकची प्रस्तुती असलेल्या ‘जीवाचं रानं’ या म्युझिक अल्बममध्ये अभिनेता विश्वास पाटील सोबत तिचा गावरान ठसका अनुभवता येणार आहे. गावच्या मातीचा गंध देणार हे गाणं प्रत्येकाला निखळ आनंद देईल, असा विश्वास हे दोघे व्यक्त करतात.

संगीत विश्वात श्री अधिकारी ब्रदर्स यांच्या ‘मायबोली’ संगीत वाहिनीने आपला वेगळेपणा जपत प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. प्रेक्षकांची आवड जपणारी ही वाहिनी आता संगीत निर्मितीमध्ये पाऊल टाकत ‘मायबोली म्युझिक’ च्या माध्यमातून संगीत निर्मितीतही आपलं दमदार स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबत प्रेक्षकांना आवडतील अशी गाणी सातत्याने देण्याचा मायबोली म्युझिकचा मानस आहे. ‘जीवाचं रानं’ या अल्बमने याचा ‘श्रीगणेशा’ आम्ही केला असून संगीत क्षेत्रासाठी ‘मायबोली म्युझिक’ एक उत्तम व्यासपीठ ठरेल असा विश्वास श्री अधिकारी ब्रदर्सचे कैलाशनाथ अधिकारी यांनी व्यक्त केला.

‘जीवाचं रानं’ अल्बमद्वारे ‘मायबोली म्युझिक’ने संगीत निर्मिती क्षेत्रात प्रस्तुतकर्ते म्हणून पहिलं पाऊल टाकलं आहे. सगळ्यांना आवडतील अशी वेगवेगळी गाणी देण्याचा मानस मायबोली म्युझिकचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर अरविंद दरवेश यांनी बोलून दाखविला. विजय भाटे यांनी संगीत निर्मिती केली असून रोहन तुपे यांनी संगीत संयोजन केलं आहे. मनीष महाजन यांनी गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. राहुल काळे यांच्या लेखणीतून सजलेल्या या गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि शुभांगी केदार यांचा स्वरसाज लाभला आहे. मिक्सिंगची जबाबदारी केवल वाळंज यांनी सांभाळली आहे. अर्चित वारवडे आणि मनिष महाजन यांचं नृत्य दिग्दर्शन या गाण्याला लाभलं आहे.