इच्छाशक्तीवर उभा राहिलेला तिरंदाज- आदिल अन्सारी

खेलो इंडिया पॅरा गेम्स

‘त्याच्या’ आयुष्यात सगळं काही सुरळीत सुरू होते. पण, बारावीत असताना झालेल्या एका अपघाताने त्याला कायमस्वरुपी दिव्यांग केले. पण, यानंतरही तो स्वस्थ बसला नाही. यातूनही तो उभा राहिला आणि तिरंदाजीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सराव आणि मेहनतीने उभा राहत आता पॅरालिम्पिकचे वेध लागलेला हा खेळाडू म्हणजे मुळ भिवंडीचा पण, पुण्यात रणजित चामले यांच्याकडे प्रशिक्षण घेणारा आदिल अन्सारी.

पॅरालिम्पिकची तयारी करत असतानाच आदिलने प्रवासात आलेल्या पहिल्या पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतही आपली छाप पाडली आणि महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. हातानेही धनुष्याची प्रत्यंचा ओढायला जेथे कठिण जाते, तेथे आदिल तोंडाने प्रत्यंचा ओढतात. अपघातात त्यांच्या हात आणि पायाच्या बोटांमधील संवदेना जवळ जवळ संपुष्टात आली आहे. त्यानुसार त्यांनी आपल्या धनुष्यातही आवश्यक ते बदल करून घेतले. आता तो यासगळ्याला चांगला सरावला आहे. दिव्यंगत्व आल्यानंतरही खेळात कारकिर्द घडविण्याचा ध्यास घेतलेल्या आदिलने पोहण्यापासून सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकही मिळविले. मात्र, त्यानंतरही जलतरण व्यवस्थापनाने त्यांना पोहण्यास मनाई केली. सुवर्णपदकानंतर मला अडवले जाणार नाही असे वाटले होते. मात्र, माझी शारीरिक स्थितीपाहून त्यांनी मला पोहण्यापासून दूरच ठेवले. त्याचवेळी तिरंदाजी प्रशिक्षक चामले यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या प्रेरणेने मी तिरंदाजीचा सराव करायला सुरुवात केली असे आदिल सांगतो. आशियाई क्रीडा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेपाठोपाठ आदिलने आता खेलो इंडियातही आपला दबदबा राखला. आशियाई स्पर्धेतील यशानंतर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्याशी संवाद साधला होता. हा आपल्या कारकिर्दीमधील मोठा क्षण असल्याचे तो मानतो.

आदिलच्या कामगिरी संदर्भात प्रशिक्षक रणजित चामले यांच्याशी संपर्क साधला असता, ‘डब्लूवन’ या पॅरा तिरंदाजीतील कठिण प्रकारातील आदिल सर्वात यशस्वी तिरंदाज आहे. आज तो अव्वल क्रमांकाचा तिरंदाज आहे. प्रचंड मेहनत करून त्याने यश मिळविले आहे आणि त्याने पॅरालिम्पिकचे उद्दिष्ट बाळगले असून, तो त्यातही यशस्वी होईल, असे चामले यांनी सांगितले.