मुंबई: विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम हायस्कूलमध्ये आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या पालखी पूजन व सामूहिक पसायदानाने झाली, ज्यामुळे वातावरण भक्तीमय झाले. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात “रिंगण पालखी” सादर करून टाळ-मृदुंगाच्या गजरात परिसर दुमदुमवला.
“हिरवी वारी” या संकल्पनेतून पर्यावरण दिंडी काढून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. संत साहित्यावर आधारित “पुस्तक परीक्षण” व कार्यकामाची रंगत वाढवण्यासाठी प्रश्न मंजुषा घेण्यात आली. तसेच तबला-हार्मोनियमची विशेष वाद्य वादन सादरीकरणे झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आयकर आयुक्त प्रदीप मिश्रा, मीना मिश्रा व त्यांच्या कन्या उपस्थित होत्या. सर्व स्तरातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या “सामान्यातून असामान्याकडे” या ध्येयाला अनुसरून हा सांस्कृतिक आणि संस्कारक्षम उपक्रम यशस्वी झाला.