स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे शौर्य, विज्ञान, समाजसेवा, स्मृती पुरस्कार घोषित !

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार, स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार यांची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या २१ मे २०२३ या दिवशी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार – २०२३’ हा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना (मरणोत्तर) प्रदान केला जाणार आहे. तसेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२३’ हा कानपूर आय. आय. टी. चे संचालक प्रा. अभय करंदीकर, यांना देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा पुरस्कार – २०२३’, हा पुरस्कार नागपूरच्या मैत्री परिवार या संस्थेला घोषित करण्यात आला आहे. तर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी असणारा व्यक्ती वा संस्थेसाठी असणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार – २०२३’ हा यावेळी रत्नागिरी येथील अधिवक्ता प्रदीप (बाबा) चंद्रकांत परुळेकर यांना देण्यात येणार आहे.