राहोची २० कोटी रुपयांची निधी उभारणी

मुंबई : राहो या भारतातील अग्रगण्य डिजिटल फ्रेट नेटवर्कने प्री-सीरीज ए फेरीसाठी गेल्या वर्षभरात ४ पट मुल्यांकनात २० कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. या फेरीचे नेतृत्व इन्फ्लेक्शन पॉइंट व्हेंचर्स (आयपीव्ही), रूट्स व्हेंचर्स, ब्लूम फाऊंडर्स फंड आणि विजय शेखर शर्मा, कुणाल शाह, के कृष्ण कुमार, व्यंकटेश विजयराघवन, असीम खुराना यांसारख्या प्रमुख एंजल्सनी केले. संपूर्ण देशात राहोची भौगोलिक उपस्थिती वाढवण्यासाठी आणि फ्रेट मॅचिंग स्वयंचलित करण्यासाठी डेटा सायन्स आणि एमएल क्षमता मजबूत करण्याकरिता नवीन भांडवलाचा वापर केला जाईल.

राहोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज म्हणाले, ‘भारतातील ट्रकर्स आणि ड्रायव्हर्सचे जीवन अधिक चांगले बनवण्याचे आमचे ध्येय कायम ठेवण्याचा आम्हाला आनंद होत आहे. या निधीच्या उभारणीसह आम्ही भारतातील अधिक भौगोलिक क्षेत्रांपर्यंत आमची पोहोच वाढवण्याची योजना आखत आहोत, तसेच आमची मालवाहतूक जुळवण्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आमची डेटा सायन्स आणि मशिन लर्निंग क्षमता प्रबळ करू. राहोमध्ये आम्ही सर्वांसाठी उज्वल भविष्य निर्माण करण्याप्रती कटिबद्ध आहोत.’

विजय शेखर शर्मा यांनी सांगितले, ‘मी इम्तियाज यांना १५ वर्षांहून अधिक काळापासून ओळखतो आणि मी ट्रकर्स आणि ड्रायव्हर्सच्या कल्याणासाठी राहोच्या मिशनमध्ये वैयक्तिकरित्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. डिजिटायझेशनमुळे अधिक उद्योगांवर परिणाम झालेला दिसत असल्याने ट्रकिंग मार्केटची कार्यक्षमता वाढवण्याची क्षमता प्रचंड आहे आणि मी राहोसोबत या राइडची सुरूवात करण्यास उत्सुक आहे.’

गुरगाव-स्थित राहो चेन्नई, बेंगळुरू, कोईम्बतूर, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, कानपूर, कर्नाल यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये उपस्थितीसह भारतातील १५ हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे. नवीन निधीसह स्टार्टअपचा त्यांचे नेटवर्क आणखी विस्तारण्याचा आणि रिकामे अंतर कमी करण्यासाठी ट्रकिंग स्पेसमध्ये कार्यक्षमता वाढवण्याचा मनसुबा आहे.