मुंबई: मुंबई उपनगरातील अंधेरीच्या जुहू येथील ‘उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागातील’ विद्यार्थ्यांनी आंतरशालेय स्पर्धांमध्ये बक्षिसांची भरघोस लयलूट करत अटकेपार झेंडा रोवला आहे.अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे यंदा विद्यानिधी विद्यालयाच्या मराठी माध्यमाने राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. मल्लखांब या पारंपारिक खेळात नैपुण्य कामगिरी बजावत विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागातील कुमार राज कस्तुरे यांनी जिल्हा स्तरावर सहावा क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
खेळासोबतच विद्यानिधीचे विद्यार्थी शैक्षणिक कामगिरीतही कुठेही कमी नाहीत यंदा एन.सी.एस.सी या संस्थेच्या विज्ञान प्रकल्पात सहभाग घेत विज्ञान विषयातील कृषी प्रकल्प जिल्हास्तरावर प्रथम येत राज्यस्तरापर्यंत पोहचला आहे.तालुकास्तरावरील सहशालेय उपक्रमात सहभाग घेत विज्ञान प्रकल्प ‘ जल आपदा धोक्याची घंटा’ हा प्रकल्प तालुकास्तरावर प्रथम, जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. हाच प्रकल्प अगस्त्या फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्तरापर्यंत निवड होणं ही सुद्धा विद्यानिधीसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.विद्यानिधीवर सरस्वतीप्रमाणे नटराजाची कृपा ही भरभरून आहे.कारण सलग तीन वर्ष तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत जिल्हास्तरापर्यंत पोहोचला. मुंबईत मानाची समजली जाणारी प्रबोधन क्रीडामंच नृत्य स्पर्धा सलग तीन वर्षे विजयी होत फिरता चषक पुन्हा शाळेत दाखल झाला आहे.
राज्यस्तरीय सिम्बलबम लाठीकाठी स्पर्धेत मुंबई जिल्हास्तरीय दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी विद्यानिधी शाळेला मिळाली. तालुकास्तरीय सहशालेय समूह गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरावर पोहोचला. तालुकास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रुती घगवे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. ऑल इंडिया बालकंजी बारी स्पर्धेत महेंद्र घुरके आणि ओम हेंबाडे या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले. तायक्वांडो जिल्हास्तरीय स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके विद्यार्थ्यांनी प्राप्त केले. संस्कृती कलादर्पणतर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात शुभम कोळेकर आणि लहान गटात प्रणाली बोडेकर प्रथम तर विकास घुरके उत्तेजनार्थ आणि गीत गायन स्पर्धेत श्रुती घगवेला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
विद्यानिधीत विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकही कमी नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुका स्तरावरील सहशालेय उपक्रमात शिक्षक विभागातून अनुजा थोरात यांना नैसर्गिक प्रकल्पात द्वितीय क्रमांक मिळाला आहे.तसेच कांचन पिंगळे यांना शैक्षणिक साधन निर्मिती प्रथम क्रमांक प्राप्त होऊन जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.
स्व.श्रीराम मंत्री सरांनी वंचितांसाठी खुले केलेले शिक्षणाचे प्रशस्त असे कवाड आजही तितक्याच ताकदीने उभे आहे.शाळेस लाभलेले संचालक मंडळाने अनेक व्यासपीठ विद्यार्थी आणि शिक्षकांना उपलब्ध करून दिले आहे.शाळेच्या यशस्वी उड्डानात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. पढना भी तुम्हे है, लढना भी तुम्हे है,ये लढाई खुदसेही है ये समझना भी तुम्हे है याचे धडे विद्यानिधी मराठी माध्यमात गिरवले जातात. शाळा ही समाजाची प्रतिकृती असते. भावी भारतीय नागरिक तयार करण्यात विद्यानिधी कोठेही कमी नाही. मग ते स्पर्धेचं यश असो, शिक्षणातील कामगिरी असो अथवा सामाजिक बांधिलकी असो,नृत्य, तायक्वांडो,लाठीकाठी,मल्लखांब, संगणक यांसारखे पारंपरिक आणि आधुनिक प्रशिक्षण असो मुलांवर संस्कार करण्याची त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याची विद्यानिधी मराठी माध्यम एकही संधी दवडत नाही.
आजच्या काळात अनेक पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमाकडे असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेता विद्यानिधी मराठी माध्यामिक विभागाला पालकांची पसंती वाढलेली दिसून येते हा मराठी माध्यमाच्या शाळांसमोर विद्यानिधी मराठी माध्यमाने नवा आदर्श घालून दिला आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत मातृभाषेतून शिक्षणाचा नवा आदर्श समाजापुढेही घालत आहे.