ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित !

२० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ…

मुंबई:मुंबईत २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव उद्‌घाटन सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘एशियन कल्चर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मुंबईत सिटीलाइट सिनेमा येथे २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. एशियन फाऊंडेशन, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग‌ आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्यानं आयोजित २० व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचं उद्‌घाटन महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्युरी मेंबर स्मिता तांबे, ज्ञानेश झोटिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल ‘एशियन कल्चर’ या विशेष पुरस्कारानं ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी तसेच ‘सत्यजित रे’ पुरस्कारानं फिल्म चळवळीचे कार्यकर्ते सुभाष देसाई यांना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं.

‘सिनेमा हे माझे जग आहे थिएटर हे माझे घर या गोष्टीपासून मी कधीच दूर जाऊ शकत नाही.’एशियन कल्चर’ पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल मी एशियन फिल्म फाऊंडेशनचा ऋणी असून हा पुरस्कार मी विनम्रपणे स्वीकारतो, ‘असे ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी सांगितले.

‘या महोत्सवाच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत जागतिक दर्जाचा चित्रपट पोहचावा, तसेच कलेची वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आजच्या तरुण पिढीला करून देणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करत वेगळ्या कलाकृतींना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे, ‘ असे महाराष्ट्र फिल्म स्टेज अँड कल्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (MFSCDC) अविनाश ढाकणे यांनी म्हटले.

यंदाच्या महोत्सवातल्या सर्वच कलाकृती दर्जेदार असून त्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी उपस्थित सर्वांचं आभार मानले.

‘आंद्रागोजी’ चित्रपटाने महोत्सवाची शानदार सुरुवात झाली. १८ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या सात दिवसांच्या महोत्सवात विविध आशियाई देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवा दरम्यान अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना पाहण्यास मिळणार आहेत.